‘शिदं’च्या आठवणी आर्टिफिशियल नाही, तर स्वत:च्या मेमरीत !: मोहन आगाशे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:19 PM2024-07-29T12:19:01+5:302024-07-29T12:20:32+5:30
त्यांच्यासारखी दुर्मीळ व्यक्ती पुन्हा होणे नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : ‘शिदं’ यांना आज मी मुद्दाम जाऊन भेटणार आहे. त्यांच्या पाया पडणार आहे. त्यांच्यासारखी व्यक्ती आता दुर्मीळच. माझ्याकडे त्यांच्या काही आठवणी आहेत, ज्या कधी जाऊच शकत नाहीत, इतक्या जुन्या आहेत. नकळत्या वयात झालेले ते सगळं आहे. त्यांची आठवण मोबाइलच्या आर्टिफिशियल मेमरीत नाही, तर माझ्या स्वत:च्या मेमरीत आहे आणि ती माझ्याबरोबरच जाणार आहे,’ अशी आठवण ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
आगाशे म्हणाले, ‘मी सुभाषनगरमध्ये राहायचो. तेथे गल्ली क्रमांक ४ मध्ये प्रथितयश व्यक्ती राहायचे. त्यामध्ये योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, ठाकूर बिडीवाले, द. मा. मिरासदार, शि. द. फडणीस, देवधर क्लासवाले. शाळेत असताना मला त्यांची चित्रे खूप आवडायची. निर्मळ मनाचा, कुठलाही ईगाे नसणारी व्यक्ती. आज लोक आगाऊ झालेत. त्या प्रवृत्तीच्या अगदी विरोधातील असे शिदं आहेत. त्यांच्यासारखी दुर्मीळ व्यक्ती पुन्हा होणे नाही.’
‘मला ते चित्र काढताना आवडायचे. तेव्हा मला चित्रांची आवड होती. मी चित्रकलेच्या परीक्षादेखील दिल्यात. लहानपणी आपल्यावर नकळत संस्कार होतात. त्यात दमांच्या गोष्टी, शिदंचा स्टुडिओ आहेत. आजही माझ्या डोळ्यासमोर तो स्टुडिओ आहे. वेगवेगळ्या निमित्ताने ‘शिदं’ची भेट व्हायची. मी पुढे नाटकवाला झालो. मला त्यांच्याविषयी खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांना माझ्याविषयी ममत्व आहे. लोकांनी त्यांना रोड मॉडेल ठेवावे. त्यांनी त्यांची स्वत:ची ओळख जपली. स्वत:ची शैली जपली.
त्यांच्या क्षेत्रात ते करत असलेले काम इतर कोणी करत नाही. आज राज ठाकरे आहेत, मंगेश तेंडुलकर होते. आर. के. लक्ष्मण होते. त्यांचा वेगळा ठसा होता. पण शिदं मार्मिक विनोद करतात,’ असेही आगाशे म्हणाले.
‘लहानपणी मी साबण, तेल विकायचो. गल्लीभर हिंडायचो. त्यातून मग मोठ्या व्यक्तींच्या घरी जायचो. मी एकदा मिरासदारांची सही घ्यायला गेलो होतो. मी शि. द. फडणीस यांचीही सही घेतली. स्वाक्षरीचे पुस्तकच तयार केले होते. त्यामध्ये चिं. वि. जोशी, प्र. के. अत्रे, शि. द. फडणीस, ना. सी. फडके अशांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणी मनात कायम राहतील आणि माझ्यासोबतच जातील,’ असे ते म्हणाले.