...म्हणून पुणेकरांना आली जोशी, अभ्यंकर खून खटल्याची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:53 PM2020-01-10T13:53:05+5:302020-01-10T13:54:54+5:30
पुण्यासह देशभर गाजलेल्या जोशी अभ्यंकर खुन खटल्यातील ४ कैद्यांना २५ ऑक्टोबर १९८३ रोजी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती़. त्यानंतर देशात पहिलाच प्रसंग आहे़.
पुणे : दिल्लीच्या न्यायालयाने निर्भया खटल्यातील चारही गुन्हेगारांना २२ जानेवारी रोजी फाशीची शिक्षा देण्याचे वारंट जारी केले आहे़. देशात तब्बल ३६ वर्षांनंतर एखाद्या प्रकरणात चार कैद्यांना एकाच दिवशी फासावर लटकले जाणार आहे़. पुण्यासह देशभर गाजलेल्या जोशी अभ्यंकर खुन खटल्यातील ४ कैद्यांना २५ ऑक्टोबर १९८३ रोजी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती़. त्यानंतर देशात पहिलाच प्रसंग आहे़.
पुण्यातील वेगवेगळ्या चार गुन्ह्यात तब्बल १० जणांचा निर्घुण खुन करणाऱ्या राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह या चौघांना फासावर लटविण्यात आले होते़. यातील एक आरोपी सुहास चांडक हा माफीचा साक्षीदार झाला होता़. हे चारही मारेकरी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालया कमर्शियल आर्टचे विद्यार्थी होते़. दारुची नशा आणि दुचाकीची आवड पूर्ण करण्यासाठी त्यांनी गुन्हेगारीचा रस्ता पकडला तो त्यांना फाशीकडे घेऊन गेला़. सारसबागेजवळील हॉटेल विश्वचे मालक हेगडे यांचा मुलगा प्रकाश हेगडे या वर्गमित्राचा खुन करुन त्यांनी त्याचा मृतदेह पेशवे पार्कमधील तलावात एका पिंपात भरुन टाकला होता़. त्यानंतर त्यांच्या वडिलांना खंडणी मागितली होती़. १६ जानेवारी १९७६ रोजी त्यांनी हा पहिला खुन केला़. त्यानंतर या मारेकऱ्यांनी ३१ ऑक्टोबर १९७६ रोजी विजयानगर कॉलनीमध्ये राहणारे अच्युत जोशी आणि त्यांची पत्नी उषा यांचा राहत्या घरी खुन केला होता़. त्यांच्या घरातून दागिने व रोख रक्कम चोरली होती़. दोन्ही खुन करण्यासाठी नायलॉनची दोरी व विशिष्ट प्रकारे गाठी मारुन केला होता़. तसेच संपूर्ण घरात अत्तर फवारण्यात आले होते़. जेणे करुन श्वान पथकाला माग काढता येऊ नये़.
प्रकांड पंडित काशिनाथशास्त्री अभ्यंकर, त्यांच्या पत्नी इंदिराबाई, नातू धनंजय, नात जाई आणि घरात काम करणाऱ्या सखुबाई वाघ अशा ५ जणांचा खुन १ डिसेंबर १९७६ रोजी करण्यात आला़. या निर्घुण हत्येने पुण्यासह संपूर्ण देशभर एकच खळबळ उडाली़. येथेही नायलॉनची दोरी व अत्तर फवारण्यात आले होते़. त्यानंतर चार महिन्यांनी हे खुन उघडकीस येऊ नये, म्हणून त्यांनी त्यांचा मित्र अनिल गोखले याचा खुन करुन मृतदेह येरवडा येथील नदीपात्रात टाकून दिला होता़. गोखले याच्या खुनप्रकरणाच्या तपासासाठी ते वारंवार पोलिसांकडे चौकशी करीत असल्याने त्यातून पोलिसांना संशय आला व त्या देशाला हदरवून सोडणारे खुनाचे सत्र उघडकीस आले होते. सहायक आयुक्त मधुसुदन हुल्याळकर आणि पोलीस निरीक्षक माणिकराव दमामे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. पुढे ६ वर्षे हा खटला चालला़ पुण्यातील सत्र न्यायाधीश् वा़ ना़ बापट यांनी चारही जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती़ त्यानंतर २५ ऑक्टोबर१९८३ रोजी त्यांना फाशी देण्यात आली होती.
पुण्यात २७ फाशीचे गुन्हेगार
सध्या येरवडा कारागृहात २५ पुरुष आणि २ महिला असे २७ फाशीची शिक्षा झालेले गुन्हेगार आहेत़ सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली
आहे़ मात्र, त्यांची वरच्या न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मुंबईवरील हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याला येरवडा कारागृहात २१ नोव्हेंबर २०१२,रोजी फाशी देण्यात आली आहे़ येरवडा कारागृहातील ही शेवटची फाशी आहे़
जोशी अभ्यंकर खुन खटल्यावर निघाला होता चित्रपट
पुण्यात गाजलेल्या जोशी अभ्यंकर खुन खटल्यावर आधारित ‘माफीचा साक्षीदार’ हा चित्रपट आला होता़. निर्माते हिरालाल शाह, दिग्दर्शक राजदत्त यांनी हा चित्रपट करायचे ठरवले होते़. मधुसुदन कालेलकर यांच्याकडे पटकथा व संवादची जबाबदारी सोपविली होती़. प्रत्यक्ष चित्रिकरणात सुरुवात झाल्यावर पटकथेत काही फेरबदल करावे लागले़. त्यानंतर राजदत्त यांनी दिग्दर्शन सोडले़ त्याची जबाबदारी व्ही़ रवींद्र यांच्यावर आली़. यातील मुख्य सुत्रधार राजेंद्र जक्कल याची भुमिका नाना पाटेकर यांनी केली होती़. त्यांच्याबरोबर किशोर जाधव, प्रदीप पवार, बिपिन वर्टी, जयवंत मालवणकर, मोहन गोखले असे कलाकार होते़.
चित्रपट होणार असल्याचे समजल्यावर त्यावर मोठा वादंग झाला होता़. या घटनेमधील पिडितांच्या कुटुंबियाना हे मान्य होईल का यावरही पुण्यात चर्चा झडली होती़. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यातील काही दृश्यांवर सेन्सॉरने आक्षेप घेतल्याने निर्माते शाह यांना मोठा संघर्ष करावा लागला़. शेवटी दोन वर्षे सेन्सॉरमध्ये अडकल्यानंतर अखेर १९८६ मध्ये हा माफीचा साक्षीदार प्रदर्शित झाला होता़. जक्कल याचा खुनशीपणा नाना पाटेकर यांनी
आपल्या भूमिकेतून पूरेपूरे समोर आणला होता़. त्यामुळे हा चित्रपट नाना पाटेकर याच्या नावाने आजही ओळखला जातो़.