दौंड-पुणे धावली आठ डब्यांची मेमू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:47+5:302021-04-09T04:10:47+5:30
दौंड: गेल्या कित्येक वर्षापासून दौंड-पुणे दरम्यान, इलेक्ट्रिक लोकल (मेमू) सुरू करावी, अशी मागणी होती. अखेर या मागणीला मूर्त ...
दौंड: गेल्या कित्येक वर्षापासून दौंड-पुणे दरम्यान, इलेक्ट्रिक लोकल (मेमू) सुरू करावी, अशी मागणी होती. अखेर या मागणीला मूर्त स्वरूप आले असून गुरुवारी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी पहिली दौंड-पुणे आठ डब्यांची मेमू धावली. आमदार राहुल कुल यांनी हिरवा झेंडा दाखवून ही मेमू सुरू झाली. दरम्यान, या वेळी फटाक्यांची आतषबाजीही केली.
या वेळी इंजिनचालक अंकुश शेळके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्टेशन मास्तर एच. एल. मीना, आर. बी. सिंह, राहुल संगपाळ, दौंड - पुणे प्रवाशी संघाचे सचिव विकास देशपांडे, योगेश कटारिया, मोहन नारंग, आबा वाघमारे , गणेश शिंदे ,अकबर शेख , आयुब तांबोळी ,रियाज पटेल , बालाप्रसाद मंत्री उपस्थित होते.
दौंड रेल्वे स्थानकातून ही मेमू सकाळी ७ वाजून ५ मिनीटांनी तर पुणे रेल्वे स्थानकातून ७ वाजून ५ मिनीटांनी सुटेल तसेच सायंकाळी दौंड रेल्वे स्थानकातून सव्वा सहा वाजता तर पुणे रेल्वे स्टेशन मधून पाऊणे सात वाजता निघेल.
ही लोकल सुरु होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे , आमदार राहुल कुल , दौंड-पुणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी रेल्वे प्रशासनाबरोबर सातत्याने पाठपुरावा केला होता.
दौंड-पुणे विद्युत लोकल सुरु करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यासंदर्भात सुळेंनी लोकसभेतही आवाज उठवला होता. माझ्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच विविध संघटनांनी यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे हे श्रेय सर्वांचेच आहे. गाजावाजा आम्हालाही करता आला असता परंतु, कोरोनाचे नियम आम्ही पाळत आहोत नाही तर धूमधडाक्यात लोकलचे स्वागत केले असते.
रमेश थोरात, अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक.
०८ दौंड
दौंड ते पुणे दरम्यान सुरू झालेल्या अद्ययावत इलेक्ट्रिक लोकलला हिरवा झेंडा दाखवताना आमदार राहुल कुल.
उरुळी रेल्वे स्टेशनवर मेमूचे उत्साहात स्वागत
उरुळी कांचन: सुमारे ३५ वर्षांपासूनची पुणे दौंड मेमू लोकलची मागणी पूर्ण झाली आहे. भाजपा व राष्ट्रवादी या पक्षांच्या श्रेय वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उरुळी रेल्वे स्टेशन येथे सर्वसामान्य नागरिकांनी या मेमूचे उत्साहात स्वागत केले.
प्रयागधाम ट्रस्टच्या महात्माजींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी ७.३८ वाजता पुण्याहून दौंडकडे जाणाऱ्या इलेक्ट्रिक लोकल मेमूचे तर ८ वाजता दौंडवरुन पुण्याकडे जाणाऱ्या इलेक्ट्रिक लोकल मेमूचे उरुळी स्टेशनवर लोकलच्या चालकांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करीत स्वागत केले. याप्रसंगी महात्माजी अनमोल रामानंद, योग रामानंदजी, मनोज बजाज, स्टेशन मॅनेजर एम. एस. माने व मोहन सालोडकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. दरम्यान, भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक लोकल मेमूमुळे डिझेलची व वेळेची बचत होणार असून, पर्यावरणाची हानी टळणार आहे.
०८ उरुळी कांचन