उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे पुरूषांना करावा लागतोय वंध्यत्वाचा सामना
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: October 29, 2023 06:28 PM2023-10-29T18:28:47+5:302023-10-29T18:30:06+5:30
उच्च रक्तदाब आणि मधुमेह याचा परिणाम जसा किडणी, डाेळे यासरख्या अवयवांवर हाेताे तसाच ताे पुरूषांच्या वंध्यत्वावर देखील हाेत असल्याचे दिसून येतंय
पुणे : पुण्यातील खराडी येथे राहणारे जतीन देसाई (नाव बदलले आहे) गेल्या ४ वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर औषधोपचार करत होते. तसेच त्यांच्या शुक्राणूंची संख्या खालावल्याने त्यांना प्रजनन विषयक व वंध्यत्वाच्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे पुरूषांमध्ये वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे.
तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांमधील मधुमेह आणि प्रजनन समस्या यांच्यात परस्परसंबंध आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह याचा परिणाम जसा किडणी, डाेळे यासरख्या अवयवांवर हाेताे तसाच ताे पुरूषांच्या वंध्यत्वावर देखील हाेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे, पुरुषांमधील शुक्राणू निर्मितीवर परिणाम होऊन हार्मोनल संतुलन बिघडू शकते. त्यासाठी पुरुषांनी त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे, असा सल्ला स्त्रीराेग व वंध्यत्वतज्ज्ञ देतात.
वंध्यत्व ही एक अशी समस्या आहे जी स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिसून येते. लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसने, मानसिक तणाव, लॅपटॉप्सचा अतिरिक्त वापर, घट्ट कपड्यांचा सातत्याने वापर या गोष्टी पुरुष वंध्यत्वाशी संबंधित दोष निर्माण करायला कारणीभूत ठरतात. तर, काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही पुरुषांना वंध्यत्वासारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. आता त्यामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह याचीही भर पडली आहे.
35-40 वयोगटातील जे पुरुष वंध्यत्व विषयक उपचार घेत आहेत त्यापैकी 40 टक्के जणांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेह शुक्राणूंच्या डीएनएवर परिणाम करते आणि तणावामुळे त्यांची हालचाल कमी हाेते.
शुक्राणुंची गुणवत्ता किंवा शुक्राणुंची संख्या कमी असली तरी इन विट्रो फर्टिलायझेशन आणि इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन द्वारे गर्भधारणा शक्य हाेते. ही समस्या टाळण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली राखणे आवश्यक आहे. नियमित तपासणी करून रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक असल्याचे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. निशा पानसरे यांनी स्पष्ट केले.
रक्तातील साखरेची असामान्य पातळी शुक्राणूंच्या गतिशीलतेवर परिणाम करते आणि शुक्राणूंच्या पेशींमधील डीएनए नष्ट करते. अनियंत्रित रक्तदाब देखील शुक्राणूंची संख्या कमी करत असल्याचे दिसून आले आहे. औषधाेपचाराने रक्तदाब नियंत्रणात ठेवून वंध्यत्वावर उपचार हाेतात. - डॉ. पायल नारंग, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ