कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती, गतवर्षी केवळ १५१ जणांच्याच शस्त्रक्रिया; महिलांच्या मात्र १७६४१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:13 AM2021-02-09T04:13:38+5:302021-02-09T04:13:38+5:30

निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामक समजुतीवर असलेला विश्वास तसेच अनेक ...

Men fear family planning, only 151 surgeries last year; Women's only 17641 | कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती, गतवर्षी केवळ १५१ जणांच्याच शस्त्रक्रिया; महिलांच्या मात्र १७६४१

कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती, गतवर्षी केवळ १५१ जणांच्याच शस्त्रक्रिया; महिलांच्या मात्र १७६४१

Next

निनाद देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नसबंदी केल्याने पौरुषत्वावर परिणाम होतो, अशा भ्रामक समजुतीवर असलेला विश्वास तसेच अनेक रूढीपरंपरा सुशिक्षित समाजात आजही पाळल्या जात असल्याने कुटुंबनियोजनाची जबाबदारी ही महिलांवरच आहे. गेल्या वर्षी केवळ १५१ पुरुषांनी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर जवळपास १७ हजार ६४१ महिलांनी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली.

कुटुंबनियोजनासाठी शासनातर्फे दरवर्षी मोहीम राबवण्यात येते. यासाठी उद्दिष्टही ठरवले जाते. यासाठी शासनातर्फे शस्त्रक्रिया करणाऱ्यांना अनुदानही दिले जाते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना शासनातर्फे ६०० रूपये तर इतर महिलांना २५० रूपये शस्त्रक्रियेसाठी अनुदान दिले जाते. तर पुरूषांना १ हजार १०० रूपये नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी मिळतात. स्त्रिया आणि पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जनजागृतीही करण्यात येते. मात्र, असे असतानाही केवळ नसबंदीच्या शस्त्रक्रिया या महिलांच्याच होतात. महिलांच्या तुलनेत मोजकेच पुरुष या शस्त्रक्रिया करत असल्याचे वास्तव आहे. एकीकडे समाज शिक्षित होत आहे. पण अनेक भ्रामक समजुतींमुळे तसेच भीतीपोटी नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याचे पुरूषांकडून टाळले जात आहे. यामुळे कुटुंबनियोजनाचा भार हा महिलांवरच आहे.

२०१८ मध्ये जिल्ह्यात २१ हजार ५७२ कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले होते. या वर्षी १८ हजार ७९७ महिलांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केली. तर केवळ ८७ पुरुषांनी ही शस्त्रक्रिया केली. २०१८-१९ या वर्षात १९ हजार १४९ महिलांनी शस्त्रक्रिया केली. तर केवळ १३३ पुरूषांनी शस्त्रक्रिया करून घेतली. तर गेल्या वर्षी कोरोनामुळे १७ हजार ६४१ महिलांनी शस्त्रक्रिया केली, तर१५१ पुरूषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याने शस्त्रक्रियांचा भार हा महिलांवरच पडत आहे.

चौकट

वंशाला दिवा हवा, नपुसंकत्व येईल तसेच पौरुषत्वावर परिणाम होईल या भीतीने पुरुषांकडून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे टाळले जात आहे. तसेच महिलांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात तसेच कुटुंब नियोजन ही महिलांचीच जबाबदारी आहे, असा असणाऱ्या पुरुषी आविर्भावामुळे आजही महिलांनाच शस्त्रक्रिया करण्यासाठी भाग पाडले जात आहे.

कोट

नसबंदी केल्याने पुरुषत्व कमी होते. हळूहळू नपुंसकत्व येते. पत्नीचे समाधान करता येत नाही. त्यामुळे संसार मोडेल, पत्नी घर सोडून निघून जाईल अशा भ्रामक समजुती पुरुषांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेविषयी आहेत.

- अविनाश गवई

कोट

आरोग्य विभागातर्फे आजही जनजागृती योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे पुरुषांमधल्या समजुती आजही कायम आहेत. आरोग्य विभागाच्या कुटुंब नियोजनाच्या जाहिरातीतही महिलांनाच दाखवले जाते. यामुळेही हा भार महिलांवरच आहे अशी पुरुषांची समजूत झाली असल्याने नसबंदी करण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये कमी आहे.

- श्रीकांत देशमुख

कोट

शासनातर्फे पुरुषांच्या नसबंदीचा टक्का वाठवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणारे अनुदानही जास्त आहे. मात्र, अजूनही चुकीच्या समजुती आणि भीतीपोटी नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे.

- भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Men fear family planning, only 151 surgeries last year; Women's only 17641

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.