पुरुषांएवढ्याच स्त्रियाही सशक्त
By admin | Published: August 8, 2016 01:08 AM2016-08-08T01:08:42+5:302016-08-08T01:08:42+5:30
पुरुषाइतक्याच स्त्रियाही सशक्त असून समाजाने त्यांना समजावून घ्यावे, असे प्रतिपादन परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी केले.
पिंपरी: पुरुषाइतक्याच स्त्रियाही सशक्त असून समाजाने त्यांना समजावून घ्यावे, असे प्रतिपादन परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी केले.
पोलीस संरक्षण विभागाच्या वतीने ४ ते ११ आॅगस्ट या कालावधीत चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सौदामिनी स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन डॉ. तेली यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. . यावेळी पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मुगळीकर, पोलीस निरीक्षक एम. जी. काळे, उपनिरीक्षक रत्ना सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कांकरिया आदी उपस्थित होते.
डॉ. तेली म्हणाले, ‘‘विनयभंग, छेडछाड, बलात्कार याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. युवतींवर अत्याचारासारख्या घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी आपल्याला कोणी चुकीचा स्पर्श केल्यास वेळीच आपल्या पालकांकडे तक्रार करायला हवी. अशी तक्रार आमच्याकडे आल्यास वेळीच कार्यवाही करू. कोणीही छेडछाड करीत असल्यास गप्प बसू नये. आपण गप्प बसल्यास या अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांची हिंमत वाढते. त्यामुळे आपण आपले संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.’’
प्राचार्य कांकरिया म्हणाले की, कोणी छेडछाड करीत असल्यास आम्ही महाविद्यालयात सूचना पेटी ठेवली आहे. त्या पेटीत लेखी तक्रारी कळवाव्यात.
प्राध्यापिका शबाना शेख यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य वनिता कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले.