पुरुष दिन विशेष : शेवटी कला ही कला; ती स्त्री-पुरूष असा भेद मानत नाही..!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 11:58 AM2019-11-20T11:58:45+5:302019-11-20T12:00:21+5:30

‘अभिव्यक्त होणारी जरी स्त्री असली तरी संरचनाकार गुरू हा पुरुषच..

Men's Day special : Art does not consider distribution of ladies and gents | पुरुष दिन विशेष : शेवटी कला ही कला; ती स्त्री-पुरूष असा भेद मानत नाही..!

पुरुष दिन विशेष : शेवटी कला ही कला; ती स्त्री-पुरूष असा भेद मानत नाही..!

Next
ठळक मुद्देनृत्य आणि रंगावली या कलाप्रकारांमध्येही पुरुषांनी वेगळेपण अधोरेखित

पुणे : ज्याप्रमाणे पुरुषी मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांमध्ये महिलांनी वर्चस्व सिद्ध केले, त्याचप्रमाणेच ज्या क्षेत्रांमध्ये महिला अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात अशा नृत्य आणि रंगावली या कलाप्रकारांमध्येही पुरुषांनी वेगळेपण अधोरेखित केले आहे. ‘अभिव्यक्त होणारी जरी स्त्री असली तरी संरचनाकार गुरू हा पुरुषच आहे. शेवटी कला ही कला आहे, ती स्त्री-पुरूष असा भेद पाळत नाही,’  अशा शब्दांत महिलाप्रधान कलांमध्ये नावलौकिक मिळविलेल्या कलाकारांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. 
ज्येष्ठ कथ्थक नर्तक पं. नंदकिशोर कपोते म्हणाले, ‘‘शास्त्रीय नृत्य स्त्रीप्रधान असले तरी त्याचे जनक पुरुषच आहेत. पूर्वी जेव्हा मी सुरुवातीला नृत्य करायचो , तेव्हा  मला मित्र हसत होते. ‘मुलीसारखं काय नृत्य करतो’ म्हणायचे, खूप चिडवत होते; पण घरच्यांनी माझ्या कलेला प्रोत्साहन दिलं. पुढे पंडित बिरजूमहाराजांचं मार्गदर्शनही मला लाभलं.  कालांतरानं अनेक पुरस्कारही मिळाले. नृत्यामुळे पुरुषी रुबाब कमी होत नाही व त्यातील अदा, लकबी या केवळ नृत्य सादरीकरण करतानाच असतात. एरवीच्या जीवनावर त्याचा परिणाम होत नसतो, हे पालकांनी ध्यानात घ्यावं.’’
भरतनाट्यम् नर्तक परिमल फडके यांनीही शास्त्रीय नृत्य हे माध्यम स्त्रियांच असलं तरी ते पुढे नेण्याचा मक्ता पुरुषांचा असल्याचे आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘‘अभिव्यक्त होणारी स्त्री असली तरी संरचनाकार गुरू हा पुरुषच आहे. लहानपणी माझ्यातील प्रतिभा ओळखून मला आईनं नृत्य वर्गात पाठवलं. अलीकडे रियालिटी शोमुळे नृत्य क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त झालं असून, शास्त्रीय नृत्यशैली अलीकडे जास्त प्रगल्भ होत चालली आहे. जी मुलं शास्त्रीय नृत्यात येतात, त्यांना आम्ही पुरुषप्रधान रचनेचं नृत्य शिकवतो. बाह्य प्रकटीकरणाकडे जास्त लक्ष न देता मुलगा म्हणून त्याला नृत्य आवडत असेल,  तर पालकांनी मुलाची आवड जोपासावी. तसेच काही पुरुष नृत्य न करताही त्यांच्या चाली बायकांसारख्या असतात; त्यामुळे नृत्य करून कुणाचीही चाल बदलत नसते किंवा पुरुषत्वाचा रुबाब कोणत्याही प्रकारे कमी होत नसतो, हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.’’
‘रांगोळी’ कलाकार संगमेश्वर बिराजदार यांनी  ‘रंगावली’च्या हटके कलाप्रकारात  वेगळा ठसा उमटविला आहे. ते म्हणाले, ‘‘सहसा रांगोळी मुली किंवा महिलाच काढतात. मी लहानपणी आईला व बहिणीला रांगोळी काढताना बघून त्या रांगोळीतून चित्र कसं काढायचं, हे शिकलो. त्यात विविध प्रकारचे आकार असतात. भौमितिक आलंकारिक आकार रांगोळीच्या माध्यमातून कसं काढतात ते मी बघायचो आणि माझ्यामध्ये कलेविषयी आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे  रांगोळी मी मुलगा आहे म्हणून ती काढू नये किंवा त्या गोष्टीची कधी मला लाज वाटली नाही आणि  घरच्यांनीही कधीही विरोध नाही केला, उलट कलेला प्रोत्साहनच दिलं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रांगोळी स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत.’’
 

Web Title: Men's Day special : Art does not consider distribution of ladies and gents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.