तेजस्विनी बसमध्ये दुपारी पुरुषांनाही ‘एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:01 AM2019-04-01T03:01:05+5:302019-04-01T03:01:16+5:30
उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाचा निर्णय : धावतात रिकाम्या बस
पुणे : महिला प्रवाशांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमधून आता दुपारच्या वेळी पुरुष प्रवाशांनाही प्रवास करता येत आहे. या वेळेत बस रिकाम्या जात असल्याने उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘तेजस्विनी’ बससेवेची अवस्था यापूर्वीच्या महिला विशेष बससारखीच होणार की काय, असा प्रश्न महिला प्रवासी उपस्थित करत आहेत.
मागील वर्षी जागतिक महिला दिनी म्हणजे दि. ८ मार्चपासून खास महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात आली. सध्या या तेजस्विनीच्या सुमारे ४० बस मार्फत ४५० हून अधिक फेऱ्या होत आहेत. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या बसला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात प्रतिमहिना सरासरी २ लाख ३३ हजार महिलांना तेजस्विनी बसमधून प्रवास केला आहे. तर प्रतिमहिना सुमारे ३४ लाख ३७ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. प्रतिकिलोमीटर सुमारे ३३ रुपये उत्पन्न मिळत असल्याची माहिती पीएमपी प्रशासनानेच दिली आहे; मात्र त्यानंतरही ही सेवा तोट्यात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत तेजस्विनी बसला महिला प्रवाशांची गर्दी असते. प्रामुख्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नोकरीला जाणाऱ्या महिला या सेवेला अधिक प्राधान्य देत आहेत; पण दुपारी १२ ते ५ या वेळेत तुलनेने खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. इतर बसलाही या वेळेत गर्दी कमी असते. त्या तुलनेत बहुतेक तेजस्विनी बस रिकाम्या धावत असल्याचे चित्र होते. त्यामुळे सरासरी उत्पन्नावर परिणाम होत होता. त्यामुळे दुपारी गर्दी कमी असल्याने पुरुष प्रवाशांना या बसमधून प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतच्या सूचना चालक व वाहकांना दिल्या असून, त्यानुसार पुरुष प्रवासीही दुपारी या बसमधून प्रवास करताना दिसत आहेत. दरम्यान, बसमध्ये गर्दी नसल्यास कोणत्याही वेळेत पुरुष प्रवाशांना बसमध्ये घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याचे वाहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणत्याही वेळेत बसमध्ये पुरुष प्रवासी दिसत असल्याने
महिला प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तेजस्विनी बसला सकाळी व सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र दुपारच्या सत्रात या बस रिकाम्या धावत असल्याचे चित्र होते. त्यामुळे तोटा होऊ नये, या उद्देशाने दुपारच्या वेळी या बसमधून पुरुष प्रवाशांनाही प्रवास करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त अन्य वेळेतही पुरुष प्रवासी प्रवास करत असतील, तर त्याबाबत सूचना दिल्या जातील.
- अजय चारठणकर,
सहव्यवस्थापकीय संचालक