पाबळ येथील ‘त्या ’ मतिमंद निवासी शाळेचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:52 PM2018-04-23T19:52:09+5:302018-04-23T19:52:09+5:30
मुंढवा येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने शिरुर येथे मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. येथील एक मतिमंद मुलगी गरोदर असल्याचे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उघड झाले होते.
पुणे : लैंगिक अत्याचारामुळे मतिमंद मुलगी गरोदर राहिल्या प्रकरणी शिरुर तालुक्यातील पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेचा परवाना अखेर रद्द करण्यात आला. अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी नुकताच तसा आदेश दिला असून, येत्या ३० एप्रिल पासून शाळेचा परवाना संपुष्टात येणार आहे.
मुंढवा येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने शिरुर येथे मतिमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. येथील एक मतिमंद मुलगी गरोदर असल्याचे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उघड झाले होते. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.
या घटनेची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या घटनेनंतर अनेक पालक मुलींना घरी घेऊन गेले होते. तपासणीवेळी अनुदानित ४० विद्यार्थ्यांपैकी २८ आणि विनाअनुदानित २० विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी उपस्थित होते. शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे छायाचित्रण जतन करुन ठेवण्यात येत नाही. त्यामुळे घटनेची उकल होईल असे छायाचित्रण उपलब्ध नाही. शाळेतील मुलांची नियमित आरोग्य तपासणी होत नसून, मुलींच्या मासिक पाळीची नोंदवही अद्यावत ठेवलेली नाही. शाळा व्यवस्थापनाचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आले होते.
याप्रकरणी अपंग कल्याण आयुक्त पाटील यांच्या समोर सुनावणी झाली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंजिरी देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव, अॅड. तुळशीदास बोरकर आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा ढवळे उपस्थित होत्या. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पाटील यांनी संबंधित शाळेचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिला. तसेच संस्थेतील मुलांचे पुनर्वसन इतर शाळेत करावे, असे आदेश जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले आहेत.