मानसिक स्वास्थ्य जपाच! जागतिक आरोग्य संघटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:00 PM2020-03-23T23:00:00+5:302020-03-23T23:00:02+5:30
सर्दी, खोकला, ताप अशी साधी लक्षणे दिसल्यासही सामान्यांना कोरोनाची भीती वाटू लागली आहे...
पुणे : कोरोना विषाणूमुळे सामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सर्दी, खोकला, ताप अशी साधी लक्षणे दिसल्यासही सामान्यांना कोरोनाची भीती वाटू लागली आहे. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्याच; मात्र मानसिक स्वास्थ्यही जपा, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आल्या आहेत. नकारात्मकतेत सकारात्मकता टिकवून ठेवा, सतत कोरोनाबाबत चर्चा करणे टाळा, कोरोनाबाधितांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू नका, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञ राहा, अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. गर्दी टाळण्याचे, स्वच्छता पाळण्याचे आवाहन सर्व स्तरांतून केले जात आहे. इतर देशांमधील परिस्थिती लक्षात घेता आपल्याकडील संभाव्य धोका ओळखून सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. लोकांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर समाजाचा एक भाग म्हणून कसे वागावे, कोरोनाबाधितांबाबत काय दृष्टिकोन बाळगावा, कोरोनाविरोधातील लढाई एकजुटीने कशी लढावी, याबाबत आरोग्य संघटनेतर्फेमार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिक, सफाई कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी, विलगीकरणातील लोक यांच्याबाबत विविध सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी कशी घ्यावी, याबद्दलच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
मानसिक स्वास्थ्य कसे राखावे, याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी म्हणाल्या, ‘सोशल मीडियावर सतत फॉरवर्ड होत राहणारे मेसेज ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे. बºयाचदा खूप जुनी, अतार्किक माहिती वारंवार आपल्यासमोर येत राहते आणि तीच खरी वाटायला लागते. त्यातून लोक अधिक पॅनिक होतात, फोबिया होण्याची शक्यता असते. अशा काळात काळजी घ्यायला हवी, मात्र वातावरणही शांत ठेवायला हवे. दिवसभर फोनला, टीव्हीला चिकटून राहण्याची गरज नाही. दिवसातून दोन-तीन वेळाच बातम्या पाहिल्या तरी काही फरक पडणार नाही. धावपळीमुळे राहून गेलेली अनेक कामे या काळात करता येतील. केवळ घड्याळाच्या काट्यावर दिवस ढकलण्यापेक्षा दिवस आनंदी कसा होईल, हे पाहिले पाहिजे.’
डॉ. गौरव वडगावकर म्हणाले, ‘सध्या सर्व जण घरी आहेत. घरी असल्याचा मनमुराद आनंद घ्या, लहान मुलांशी बोला. एकटेपणाकडे नकारात्मकतेने न पाहता सकारात्मकतेने पाहा. वारंवार कोरोनाबाबत माहिती घेतल्याने काहीच फरक पडणार नाही. परिणामांना सामोरे जाण्याची मानसिकता तयार ठेवायला हवी.’
--------
नागरिकांनी काय करावे?
* कोरोनाबाधितांनी कोणतेही चुकीचे काम केले आहे, अशा नजरेने त्यांच्याकडे पाहू नका. त्यांना आपल्या पाठिंब्याची, प्रेमाची गरज आहे.
* कोरोनाबाबत कमीत कमी चर्चा करा, माहितीचा पूर अधिक भीती निर्माण करतो.
* संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, मदत करा.
-------------
कर्मचाºयांनी काय करावे?
* सध्या कर्मचाºयांना कामाचा ताण आणि कोरोनाची भीती असे दुहेरी सावट आहे. त्यामुळे सकारात्मक राहा.
* सकस आहार घ्या, पुरेशी झोप घ्या.
* समाजातील काही व्यक्तींकडून आपल्याला नकारात्मकतेची वागणूक मिळू शकेल. त्यांना परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करा.
-------
आरोग्यसेवेतील नेतृत्वाने काय करावे?
* कामाचे वितरण करताना सर्व बाजूंनी विचार करा. या परिस्थितीचा सामना तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे स्वत:ची आणि कर्मचाºयांची काळजी घ्या.
* आरोग्य व्यवस्थेतर्फे समाजापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
०००