‘स्क्रीन अॅडिक्शन’मुळे मानसिक अनारोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:58 AM2018-05-26T03:58:01+5:302018-05-26T03:58:01+5:30
महिलांनाही मोबाईल व्यसन : गुन्हेगारी, फॅन्टसी आणि व्हिडीओ गेम्समुळे मुलांवर विपरीत परिणाम
पुणे : मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर याचेही व्यसन जडते, असे कोणी सांगितल्यास तुमचा विश्वास बसेल का? परंतु, हे खरे आहे. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक याला ‘स्क्रीन अॅडिक्शन’ नावाने संबोधत आहेत. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल अथवा सोशल मीडियावर चॅटिंग करीत असाल, फेसबुकवर कोणी तुम्हाला लाईक अथवा कमेंट केली नाही तर चिडचिड होते, मोबाईल अथवा इंटरनेटवर सतत पॉर्न पाहण्याची इच्छा होत असेल, मारामाऱ्या, बलात्कार असे व्हिडीओ पाहत असाल तर सावधान! कारण हीच लक्षणं आहेत या ‘स्क्रीन अॅडिक्शन’ची.
मोबाईलच्या व्यसनामुळे नैराश्याचे शिकार झालेले रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना ‘टेलिव्हिजन शाप की वरदान’ असा निबंध लिहायला सांगितला जायचा. मात्र, आता शालेय विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि महाविद्यालयीन तरुणांपासून प्राचार्यांपर्यंत सर्वांनाच टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटने जखडून ठेवले आहे.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्रामसारखी सोशल मीडिया असो की इंटरनेटचा भरमसाट वापर असो यामुळे मुलांच्या आणि मोठ्यांच्याही मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
विशेषत: नोकरदारवर्गामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे कामाचे तास कमी होऊ लागल्याचे काही कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणामधून पुढे आले आहे. आठ तासांच्या ड्यूटीमध्ये जवळपास अडीच ते तीन तास मोबाईल सर्फिंगमध्येच खर्च होत आहेत.
तीन तास गुणिले कामगार असे कामाचे तास पाहता कंपन्यांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे काही कंपन्यांनी कामाच्या ठिकाणी मोबाईलबंदी केली आहे.
साधारणपणे पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांमध्ये कार्टून्स, मोबाईल गेम्स पाहण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: सातवी ते दहावीच्या पुढील विद्यार्थ्यांमध्ये फॅशन टेÑन्ड्स, अश्लील व्हिडीओ (पॉर्न क्लिप्स) पाहण्याचे प्रमाणही लक्षणीयदृष्ट्या वाढत चालले आहे. अशा व्हिडीओच्या क्लिप्स व लिंक्स एकमेकांना पाठविणे, त्यावर ग्रुपमध्ये चर्चा करणे हे प्रकार घडत आहेत. अभ्यासकांच्या मते हाच भविष्यातील सर्वात मोठा धोका आहे. मुलांमध्ये मानसिक विकृती येऊ लागली आहे. अल्पवयीन मुला-मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांना पॉर्न अॅडिक्शन कारणीभूत ठरत आहे.
‘प्ले स्टेशन’ नावाचे गेम्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये तब्बल ३२ हजार गेम्स आहेत. गेम्सच्या कॅसेट्स टाकून खेळ खेळायचे असतात. मुलांमध्ये याचेही मोठे आकर्षण आहे. तासन्तास मुले स्क्रीनसमोर बसून हा खेळ खेळत असतात. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहेत.
बॉडी क्लॉक बिघडल्याने स्वभाव तापट
रात्री उशिरापर्यंत जागून चॅटिंग करीत राहिल्याने अथवा टीव्ही पाहत राहिल्याने झोपण्यास उशीर होतो. त्यामुळे सकाळी लवकर उठणे होत नाही. उशिरा उठल्यानंतर दिनचर्या बिघडत जाते. शरीराचे घड्याळ (बॉडी क्लॉक) बिघडल्यामुळे शौचास होत नाही. त्यातून मळमळ, अॅसिडिटी होते. पुरेशी झोप न झाल्याने तसेच आरोग्य बिघडत चालल्याने चिडचिड होऊ लागते. स्वभाव रागीट आणि तापट होऊ लागतो. कामामध्ये तसेच अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. परिणामी ‘परफॉर्मन्स’ हळूहळू घसरू लागतो.
यामधून एक प्रकारचे नैराश्य येऊ लागते.
‘बायपोलर पर्सनॅलिटी’चे रुग्ण वाढले
ड्युएल पर्सनॅलिटी / बायपोलर पर्सनॅलिटीचे रुग्ण वाढू लागले आहेत. या रुग्णांना आपण दोन व्यक्ती असल्याचा समज असतो. ते दिवसातील आठ ते दहा तास व्यवस्थित वागतात. परंतु अचानक दोन-तीन तास प्रचंड गोंधळ घालतात. इंटरनेट, मोबाईल आणि स्क्रीन अॅडिक्शनमुळे या प्रकारचे रुग्ण वाढू लागले आहेत.
काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर मित्रांना दाखविण्यासाठी तासी १४० किलोमीटरच्या वेगाने मोटार चालविणाºया तरुणाला अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागले.
हा अपघात तरुणांची नेमकी मानसिकता दर्शवून गेला. चाकणमध्ये एका युवकाचा व्हॉट्सअॅपवर ‘बादशहा’ असे स्टेटस ठेवल्याने खून करण्यात आला होता.
गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादाला आभासी विश्वाची असलेली किनार यानिमित्ताने समोर आली.
अनेकदा फेसबुक व
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी गटांना धमकावणारे मेसेज, स्टेटस व संदेश ठेवले जातात.
कोणाच्या बोलण्याकडे
लक्ष नाही कोणाचे
घरामध्ये जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्वत:चा मोबाईल असतो. घरामध्ये सर्व सदस्य एकत्र असतानाही मौखिक संवाद होताना दिसत नाही. पालक, मुले सर्वच जण आपापले मोबाईल घेऊन बसलेले असतात. त्यावर इंटरनेट सर्फिंग, चॅटिंग अथवा गेम खेळणे सुरू असते. कोणाच्या बोलण्याकडे कोणाचे लक्ष नसते.
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राने मोबाईल वापरणाºया नागरिकांच्या वयोगटाप्रमाणे अभ्यास केला आहे. या सर्वेक्षणामध्ये पहिली ते नववीपर्यंतची मुले नेमके काय पाहतात? दहावी ते महाविद्यालयीन मुले काय पाहतात? नोकरदार आणि गृहिणींचा मोबाईल वापराचा कालावधी नेमका कोणता, याचाही अभ्यास करण्यात आला आहे.
शालेय मुले व्हिडीओ गेम खेळण्यात वेळ घालवितात. क्रिकेट, फुटबॉलसारखे मैदानी खेळही ही मुले मोबाईल स्क्रीनवरच खेळतात. ग्रुप करून काऊंटर स्ट्राईकसारख्या लष्करी गेम्स खेळण्याकडेही अधिक कल असतो. हिंसक गेम्सला विशेष पसंती या वर्गामध्ये आहे.
नोकरदारवर्गामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे कामाचे तास कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कार्यक्षमता कमी झाली. सोशल मीडियावर अतिसक्रिय असणे घातक ठरू लागले आहे.
आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन मुले अश्लील व्हिडीओ पाहण्यात अधिक वेळ घालवितात. खूपच कमी प्रमाणात ही मुले शैक्षणिक अभ्यासक्रम अथवा तत्सम साहित्य, माहितीसाठी मोबाईल वा इंटरनेटचा वापर करतात. ही मुले साधारणपणे पहाटे २ ते ४ वाजेपर्यंत आॅनलाईन असतात. सकाळी ६-७ वाजता महाविद्यालयात जातात. पुरेशी झोप न झाल्याने अभ्यासात लक्ष लागत नाही.
गृहिणींचा मोबाईलवरील सर्वाधिक वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ यादरम्यान खर्च होतो. घरातील कामे उरकली की सोशल मीडिया व अन्य शो पाहण्यासाठी गृहिणी वेळ देतात. दुपारी चारनंतर पुन्हा घरातील कामांना सुरुवात केली जाते. रात्री उशिरा पुन्हा मोबाइल हाताळले जातात.