मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 03:02 PM2022-07-01T15:02:26+5:302022-07-01T15:02:40+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी

Mental illness affects life Need to pay attention docter advice | मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

googlenewsNext

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी आहेत. चार कुटुंबातील किमान एकाला मानसिक आजार असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच दिला आहे. वाढते ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबव्यवस्थेतील बदल आदी कारणांमुळे मानसिक तणाव वाढत आहेत. याकडे मानसोपचारतज्ज्ञांनी लक्ष वेधले असून, मानसिक आजारांबाबत गैरसमज नकाेत, असे सांगण्यात येत आहे.

कोणत्याही मानसिक आजाराची सुरुवात चिडचिडेपणा, नैराश्य, वागण्यात आणि बोलण्यात फरक यातून येते. सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच; परंतु ते एका मर्यादेच्या पलीकडे जात असतील, त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मानले जाते. केवळ भारतातच नव्हे, तर देशभरात मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. मानसिक आजारांबद्दल समाजात प्रचंड गैरसमज पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला मानसिक आजार असू शकतो, हेच मान्य करायला आपण धजावतो.

समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे वेड लागलेले असणे, ही समजूत काढून टाकणे गरजेचे आहे. मानसिक आजारांसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर ते ‘शॉक’ देतात, अशा पध्दतीचे गैरसमज अजूनही पाहायला मिळतात. मानसिक आजारांमध्ये कोणतीही उपचारपद्धती सरसकट वापरली जात नाही. समुपदेशन आणि उपचारपध्दती यांच्या एकत्रिकरणातून उपचारांची दिशा ठरवली जाते.

- राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आकडेवारीनुसार सहा ते सात टक्के लोक मानसिक आजारी आहेत.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात चार कुटुंबांतील किमान एकजण म्हणजे २० पैकी एकाला मानसिक आजार असल्याचे नमूद केले आहे.

व्यक्तींशी संवाद साधणे, बोलत राहणे हा रामबाण उपाय

नैराश्य, अस्वस्थता, वास्तवाचे भान सुटणे, चिडचिडेपणा, वागण्याची पद्धत बदलणे, भीती वाटणे, बोलणे अचानक कमी होणे किंवा वाढणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, अशी विविध लक्षणे मानसिक आजारांच्या सुरुवातीला दिसून येतात. लहान मुले, तरुण, प्रौढ व्यक्ती अशा कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसू शकतात. काही लक्षणे सातत्याने दिसत असल्यास आणि अनपेक्षित त्रास होत असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. समुपदेशन, औषधोपचार आणि प्ले थेरपी, म्युझिक थेरपी, ॲनिमल थेरपी यांची जोड देऊन उपचार केले जातात. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे, बोलत राहणे हा रामबाण उपाय ठरू शकतो असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी सांगितले.  

Web Title: Mental illness affects life Need to pay attention docter advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.