पोलिसांच्या सतर्कतेमुळे मानसिक रुग्ण कुटुंबामध्ये परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:41+5:302021-08-26T04:14:41+5:30
पुणे : मध्यरात्री अडीचची वेळ. सामसूम बीएमसीसी रोड. तेथे एक तरुण दुचाकीला किक मारत होता. पण ती सुरू होत ...
पुणे : मध्यरात्री अडीचची वेळ. सामसूम बीएमसीसी रोड. तेथे एक तरुण दुचाकीला किक मारत होता. पण ती सुरू होत नव्हती. त्यावेळी गस्त घालणारे पोलीस अंमलदार अय्याज खान पठाण व कांबळे तेथे पोहोचले. पोलिसांच्या संशयी नजरेतून त्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला जायचे असल्याचे सांगितले. मग इकडे कोठे, असे विचारल्यावर या तरुणाने आपण कोल्हापूरहून पळून आल्याचे सांगितले. दोघांनीही त्याला प्रभात पोलीस चौकीत आणले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तो मानसिक रुग्ण असून कोल्हापूरहून पळून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्रयत्न करून या तरुणाला पालकांचा पत्ता शोधून त्याला कुटुंबाच्या हवाली केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक २८ वर्षांचा तरुण पुन्हा त्याच्या कुटुंबात परतला.
पोलीस अंमलदार अय्याज खान पठाण व कांबळे हे मध्यरात्री गस्त घालत असताना त्यांना हा तरुण आढळून आला होता. त्याला प्रभात पोलीस चौकीत आणले. तेथील हवालादार राजेंद्र चव्हाण यांनी विचारपूस केल्यावर त्याने आपल्याला वडील औषध पाजतात. ते आवडत नसल्याने घरातून पळून आलो, असे सांगितले. वाटेत आपला मोबाईल पडला असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याशी गोड बोलून पोलिसांनी त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेतात, असे विचारल्यावर त्याने हॉस्पिटलचे नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी हॉस्पिटलशी संपर्क साधून त्याच्या घराच्यांचे नंबर मिळविले. त्यादरम्यान, पोलिसांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तेथील महिला अंमलदार जाधव यांना या तरुणाची माहिती देऊन पत्यावर खात्री करायला सांगितले. त्यांनी इतक्या रात्री त्यांच्या पत्यावर शोध घेतल्यावर त्याची आई व काका मिळून आले. त्यांनी सांगितले की, आमचा मुलगा मानसिक रुग्ण असून तो यापूर्वीही घरातून पळून गेला होता. तुम्ही पोलीस चौकीतच त्याला ठेवा, आम्ही येतो. पोलिसांनी या संवाद सुरू ठेवून तरुणाला चहा, नाश्ता दिला. रात्रभर पोलीस चौकीतच झोपवले. सकाळी त्याचे नातेवाईक आल्यावर त्यांच्या हवाली केले. त्यांनी डेक्कन पोलिसांचे आभार मानले.
या तरुणाच्या वडिलांचा फँब्रिकेशनचा व्यवसाय आहे. तो वडिलांना व्यवसायात मदत करत असतो. वडिलांबरोबर पेट्रोल भरण्यासाठी गेला असताना तो दुचाकी घेऊन पळून गेला होता.