पुणे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'मानसिक' थकवा ; किमान दोन दिवसांच्या सुट्टीची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 08:50 PM2020-05-23T20:50:03+5:302020-05-23T21:04:16+5:30
शहरातील रुग्ण संख्या वाढत असताना सुट्या देणे शक्य होणार नाही.
पुणे : कोरोनाचा शहरात शिरकाव झाल्यापासून 'ऑनफिल्ड' काम करणाऱ्या पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यात एकही सुट्टी मिळालेली नाही. त्यामुळे मानसिक थकवा येऊ लागला असून आठवड्यात किमान एखादी तरी सुटी द्या अशी मागणी होऊ लागली आहे. परंतु, कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने ही सुट्टी मिळणे तूर्तास तरी अवघड असल्याचे अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात ९ मार्च रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली. पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनासंदर्भात ड्युटी लावण्यात आल्या. गेल्या दोन महिन्यात एकही सुटी ना घेता पालिकेचा आरोग्य विभागासह सर्वच विभाग अहोरात्र काम करीत आहेत. या काळात सर्व सुट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
मागील दोन महिन्यांपासून सुटी व रजा न घेता काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आता सुट्टीची आवश्यकता भासू लागली आहे. शारीरीकच नव्हे तर मानसिक थकवा येऊ लागल्याने कामावर परिणाम होण्याची शक्यताही हे अधिकारी वर्तवित आहेत. पोलिसांपाठोपाठ पालिकेचाही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.
पालिकेचे डोकटर्स, नर्स, आया, वॉर्ड बॉय हे तर जिवाची जोखीम पत्करून काम करीत आहेत. यासोबतच रविवार सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. अनेकदा वेळी अवेळी बैठकांचेही आयोजन केले जाते. या सर्व काळात सतत काम आणि मानसिक ताण येत असल्याने आम्हाला एखाद्या दिवसाची सुटी द्यावी अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुंबईमध्ये आठवड्यातून पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असा प्रयोग केला जात आहे. त्यानुसार पुण्यातही सुट्टी द्यावी असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
----------
ज्यांना सुटी देणे शक्य आहे त्यांना सुट्टी दिली जात आहे. परंतु, शहरातील रुग्ण संख्या वाढत असताना सुट्या देणे शक्य होणार नाही. मानसिक ताणतणाव कमी करण्याकरिता आम्ही शिबिर सुद्धा घेतले आहे. सध्या एकप्रकारे युद्धाचा प्रसंग असून त्याकरिता हरतहेर्नें प्रयत्न आणि काम करणे आवश्यक आहे.
- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका