मनसेच्या होर्डिंगवर 'कैलासवासी पुणे महानगरपालिका' उल्लेख; विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:50 PM2021-07-19T20:50:02+5:302021-07-19T20:59:59+5:30
मनसेने पुण्यात महापालिकेचा “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करत पालिकेवर निशाणा साधला आहे.
चंदननगर : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये विकासकामांवरून शीतयुद्ध रंगू लागले आहे. तसेच याचवेळी मनसे देखील आक्रमक झाली असून निवडणुकीची जय्यत तयारी देखील सुरु केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे देखील पुणे मुक्कामी तळ ठोकून आहे. मात्र, याचदरम्यान मनसेने पुण्यात महापालिकेचा “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करत जोरदार होर्डिंगबाजी करत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर निशाणा साधला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने खराडीतील जुना मुंढवा रस्त्यावर प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभारण्यात आलेल्या क्रीडांगण व मनोरंजन नगरीच्या झालेल्या दुरवस्थेबाबत खराडी तील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या दुर्लक्षाने व गलथान कारभाराविरोधात चक्क महापालिकेला “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करून श्रद्धांजली वाहिली.
खराडीतील प्रभाग क्रमांक ४ मधील सर्वे नंबर ३० जुना मुंढवा रस्ता या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने व उभारली आहे मात्र दुरवस्थेबाबत मनसेने फलक लावून प्रशासनाचे व नागरिकांचे लक्ष वेधले आहे उद्यानाच्या हातातील खेळणे तुटलेले असून कमर एवढे गवत व स्वच्छतागृहांच्या दूरदर्शनबाबत पालिकेने केलेल्या कोट्यवधी रूपये खर्च पाण्यात गेल्याबाबत फलक क्रीडांगणालाच लावला आहे.
याबाबत मनसेचे अच्युत मोळावडे व अरूण येवले यांनी सांगितले, महापालिकेने एवढा हट्ट ठेकेदार जगवण्यासाठी की मुलांसाठी केला होता. एवढे कोट्यवधी रुपयांचे उद्यान असे धूळखात पडून आहे. क्रीडा साहित्यांची स्वच्छतागृहांची तोडफोड झालेली असून केवळ महापालिका ठेकेदारांसाठी काम करते. याचा आम्ही फलक लावून पुणे महानगरपालिकेला कैलासवासी पुणे महापालिका असा उल्लेख करून निषेध केला आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकांची रणनीती ठरणार?
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही वर्षात पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौ-यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत.
मनसेला २०१२ झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये पुणेकरांनी साथ देत तब्बल २९ नगरसेवक निवडून दिले होते. मात्र, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ही संख्या अवघी दोन नगरसेवकांवर आली. पक्षाच्या संघटनात्मक कामातही मोठ्या प्रमाणावर मरगळ आली होती. स्थानिक पदाधिका-यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली होती. ही गटबाजी विधानसभा निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीमध्येही प्रकर्षाने समोर आलेली होती. पक्षाचे नेतृत्वही संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पदाधिकारी खासगीत बोलत होते.