पुणे : भंडारा डोंगराजवळ विक्रीसाठी आणेलेले २७ लाखांचे मेफेड्राॅन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:39 PM2022-04-07T14:39:17+5:302022-04-07T14:40:00+5:30
भंडारा डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ सापळा रचून कारवाई..
पिंपरी : विक्रीसाठी मेफेड्रोन जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली. त्याच्याकडून २७ लाख २० हजार रुपये किमतीचे २७२ ग्रॅम मेफेड्राॅन, रोकड, चारचाकी वाहन, असा ३२ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शस्त्र विरोधी पथकाने मावळ तालुक्यातील भंडारा डोंगराजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही कारवाई केली.
नदीम इनायत पटेल (वय ३३, रा. मुंब्रा, ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस हवालदार नामदेव खेमा वडेकर यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पटेल हा अमली पदार्थ विक्रीसाठी स्वत:जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शस्त्र विरोधी पथकाने मावळ तालुक्यातील सुदवडी गावाच्या हद्दीतील भंडारा डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २७ लाख २० हजार रूपये किंमतीचा २७२ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून चारचाकी वाहन, दोन मोबाईल फोन आणि मेफेड्राॅन हा अंमली पदार्थ असा एकूण ३२ लाख ६१ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, उपनिरीक्षक भरत गोसावी, सहायक उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे, सहायक फौजदार शाम शिंदे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत गवारी, प्रितम वाघ, नामदेव वडेकर, वसीम शेख, प्रवीण मुळूक, मोहसीन अत्तार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.