मेफेड्रोन विक्रीप्रकरणाची खेड न्यायालयात सुनावणीस प्रारंभ; तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना ओळखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:45 IST2024-12-06T09:44:02+5:302024-12-06T09:45:03+5:30
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी असलेल्या चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली.

मेफेड्रोन विक्रीप्रकरणाची खेड न्यायालयात सुनावणीस प्रारंभ; तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना ओळखले
पुणे :अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी असलेल्या चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली. तत्कालीन अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी शाकीर कौसुद्दीन जेनेरी यांनी न्यायालयात आरोपींना ओळखले. मीच दि. ७ ऑक्टोबर २०२० ला चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.
खेड येथील विशेष न्यायाधीश अश्रफ घनवाल यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शाकीर कौसुद्दीन जेनेरी यांची साक्ष नोंदविली. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. तपासात आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहा-पंधरा किलो मेफेड्रोन तयार केल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह एकूण २० जणांना अटक करून गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी खेड सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित बारा आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली आहे.
ॲड. हिरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला, तक्रारदार पोलिस अधिकारी यांनी आरोपी ललित पाटील याच्याकडून जो २० किलोचा अमली पदार्थ जप्त केला. त्याचा सविस्तर पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबतचे पुरावेदेखील त्यांनी न्यायालयात सादर केले आहेत. २० किलो मेफेड्रॉन हे वेगवेगळ्या पिशवीत आढळले होते. त्यातील दोन दोन किलोच्या बॅगा चौघांकडून जप्त करून त्यातील अमली पदार्थ राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या गुन्ह्यात तक्रारदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, यावेळी आरोपींचे वकीलदेखील न्यायालयात हजर होते.