नामांकित कंपन्यांचा बनावट माल तयार करणारा व्यापारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 09:13 PM2019-09-22T21:13:34+5:302019-09-22T21:14:42+5:30
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या लोकप्रिय बँडचा बनावट माल तयार करुन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पुणे : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या लोकप्रिय बँडचा बनावट माल तयार करुन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
हितेश राघवजी रावरिया (वय ३०, रा़ सिलीकॉन विश्व, नऱ्हे रोड) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखेने कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथील गोदामावर छापा टाकून १६ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिटमधील पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना कोंढव्यातील गोदामात नामांकित कंपन्यांच्या मालासारखा हुबेहुब बनावट माल तयार केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोकुळनगरमधील भाविका बायोकेमच्या गोदामावर गुरुवारी छापा घातला.त्यात हितेश रावरिया हा टॉयलेट क्लिनर, डिश वॉश, फ्लोअर क्लिनर, ग्लास क्लिनर वगैरे बनावट माल तयार करत असताना पकडण्यात आले. त्याच्या जवळच आणखी दोन गोदामात नामाकिंत बँडचे डिटर्जंट पावडर, फेस वॉश क्रिम, टॅमरिक क्रिम, ऑईल, हँड वॉश एअर फ्रेशनर असा बनावट तयार केलेल्या मालाचा साठा करुन ठेवण्यात आला होता. हितेश रावरिया याचा या व्यवसायाचे मालक रामजी महादेव पटेल (वय ४२, रा़ लेकटाऊन, बिबवेवाडी) व त्यांचे इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे. या मालाशी संबंधित मुळ कंपन्यांचे तपासणी अधिकारी आखलेश पांडे यांनी या जप्त केलेल्या मालाची पाहणी करुन हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचा माल बनावट व निकृष्ट दर्जाचा असल्याचे व इतर कंपन्यांचा मालही नकली असल्याचे सांगितले. हितेश रावरिया याला न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, कर्मचारी संतोष क्षीरसागर, अतुल साठे, दत्तात्रय गरुड, प्रवीण तापकीर, संदीप तळेकर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे, दत्तात्रय गरुड, सुजीत पवार यांच्या पथकाने केली.
दाेन वर्षांपासून चालू हाेते बनावट प्रकरण
हितेश रावरिया हा मुळचा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मेघपर येथील राहणारा आहे. तो सुमारे २ वर्षांपासून गोदाम भाड्याने घेऊन राजरोजपणे भरवस्तीत व्यवसाय करत होता. भारतातील नामांकित कंपन्यांचा बनावट माल तयार करुन त्यावर स्वत:ची फोलेक्स कंपनी रजिस्टर नसताना रजिस्टर असल्याचा लोगो लावत होता़ त्याद्वारे तो मालाचे उत्पादन करुन तो माल बाजारातील वेगवेगळ्या व्यापाºयांना विक्री करुन त्यांचे मार्फत या मालाची सर्व सामान्य ग्राहकांना विक्री करुन फसवणूक करीत होता.