पुण्यातील शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’मध्ये विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 09:14 AM2022-11-01T09:14:46+5:302022-11-01T09:14:58+5:30
आरबीआयने मान्य केलेले सहकार क्षेत्रातले हे देशातील पहिलेच विलीनीकरण
पुणे: श्री शारदा सहकारी बँक लि. पुणे या बँकेचे द कॉसमॉस को-ऑप. बँकेमध्ये सोमवारी विलीनीकरण करण्यात आले. आरबीआयने मान्य केलेले देशाच्या सहकार क्षेत्रातील हे पहिलेचे विलीनीकरण आहे.
श्री शारदा सहकारी बँकेची व्यावसायिक उलाढाल जवळपास ५५० कोटी असल्याची माहिती कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. रिझर्व्ह बँकेने मार्च २०२१ मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबतचे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार विलीनीकरण होणारे भारतातील, सहकार क्षेत्रातले हे पहिलेच विलीनीकरण आहे.
यावेळी कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सचिन आपटे म्हणाले की, हे दोन सक्षम बँकांचे विलीनीकरण आहे. आरबीआयचे परिपत्रक आल्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये या दोन्ही बँकांनी विलीनीकरणाबाबत सकारात्मक विचार करून त्यासंबंधीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे दाखल केला होता. त्याला रिझर्व्ह बँकेने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मान्यता दिली असून, ही विलीनीकरण योजना ३० ऑक्टोबरपासून अंमलात आली आहे. बदलत्या काळात छोट्या सहकारी बँकांना त्यांचा खातेदार टिकवायचा असेल आणि नफा-खर्चाचे योग्य व्यवस्थापन हवे असेल, तर अशा प्रकारची विलीनीकरण मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज आहे, असे सांगितले. या विलीनीकरणामुळे शारदा सहकारी बँकेच्या खातेदार, सभासदांना, खासगी क्षेत्रातील बँकेच्या दर्जाच्या सर्व सेवा-सुविधा कॉसमॉस बँकेमार्फत उपलब्ध होतील, असेही आपटे म्हणाले.
पुण्यात सर्वाधिक शाखा
कॉसमॉसच्या व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे यांनी सांगितले की, विलीनीकरणानंतर कॉसमॉस बँकेमध्ये आठ शाखांसह अंदाजे ५०,५०० ग्राहक आणि ५३३ कोटींच्या व्यवसायाच्या सेट-अपमध्ये वाढ झाले आहे. यामुळे कॉसमॉस बँकेच्या आता १५२ शाखा झाल्या. पुणे शहरात आता सर्वांत जास्त शाखा असणारी बँक कॉसमॉस झाली आहे. कॉसमॉस बँकेने आतापर्यंत १६ बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. या बँकेच्या सात राज्यांत शाखा असून, २८ हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे.