MBBS, BDS प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर; कटऑफ जास्त असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:08 PM2023-08-03T13:08:55+5:302023-08-03T13:09:21+5:30

एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी राज्यातील महाविद्यालयांची क्षमता १० हजारच

Merit list announced for MBBS BDS admission Cutoff is likely to be higher | MBBS, BDS प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर; कटऑफ जास्त असण्याची शक्यता

MBBS, BDS प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर; कटऑफ जास्त असण्याची शक्यता

googlenewsNext

पुणे : राज्यात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ४७ हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली आहे. मात्र, महाविद्यालयांची प्रवेश क्षमता १० हजारच असल्याने यंदाही प्रवेशासाठीचे कटऑफ जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सीईटी सेलकडून एमबीबीएस आणि बीडीएसची पहिली अंतिम निवड यादी ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी गुणवत्ता यादी तसेच महाविद्यालयनिहाय जागांची स्थिती जाहीर करण्यात आली. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसची एकूण प्रवेश क्षमता ४ हजार ९५० एवढी आहे. त्यापैकी ७७६ जागा या ऑल इंडिया कोट्यातील आहेत. खासगी महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता ३ हजार १७० एवढी आहे. बीडीएस अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयांतील जागा ३२६ असून त्यापैकी ४८ जागा ऑल इंडिया कोट्यातील आहेत. तर खासगी संस्थांमध्ये २ हजार ४०० जागा उपलब्ध आहेत.

दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण जागा १० हजार ८४६ एवढ्या जागा आहेत. त्यापैकी ८२४ जागा या ऑल इंडिया कोट्यातील असल्याने गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी केवळ १० हजार जागा शिल्लक राहतात. दि. १ ऑगस्टपासून पसंतीक्रम भरण्यास सुरूवात झाली असून दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. तर दि. ४ ऑगस्ट रोजी पहिली फेरीची निवड यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि. ५ ते ९ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता

एमबीबीएस (शासकीय) : ४,९५०
एमबीबीएस (खासगी) : ३,१७०
बीडीएस (शासकीय) : ३२६
बीडीएस (खासगी) : २,४००

गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्या : ४६,९५

Web Title: Merit list announced for MBBS BDS admission Cutoff is likely to be higher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.