मेरी ख्रिसमस
By Admin | Published: December 25, 2015 01:48 AM2015-12-25T01:48:12+5:302015-12-25T01:48:12+5:30
पिंपरी-चिंचवड वास्तव्य असलेला ख्रिश्चन समाज हा सेवाधर्म मानणारा आहे. त्यागी, समर्पण वृत्तीने सेवा करणे हाच ख्रिस्तीबांधवांचा मुख्य हेतू पाहायला मिळतो
सेवाधर्म मानणारा, माणुसकी जपणारा समाज
पिंपरी-चिंचवड वास्तव्य असलेला ख्रिश्चन समाज हा सेवाधर्म मानणारा आहे. त्यागी, समर्पण वृत्तीने सेवा करणे हाच ख्रिस्तीबांधवांचा मुख्य हेतू पाहायला मिळतो. त्यामुळे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सेवा करताना ख्रिस्तीबांधव दिसतात. शहरात ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या ही इतर धर्मांच्या तुलनेत कमी असली तरी त्यांचे सेवाकार्य मात्र मोठे आहे. समाजात शिक्षणाविषयीची जागृती मोठ्या प्रमाणात असली तरी गळतीचे प्रमाणही जास्त आहे. साक्षरतेचे प्रमाण चांगले असून ते शंभर टक्क्यांच्या आसपास आहे. तसेच विविध इंग्रजी माध्यमांच्या शाळाही अधिक प्रमाणावर आहेत.
तुलनेत अल्पसंख्याक असणाऱ्या ख्रिश्चन समाजाचा वावर सर्वच क्षेत्रांत आहे. समाजात जसे नोकरदार आहेत, तसे श्रमिकही आहेत. लहान-लहान व्यावसायिक आहेत तसेच मजुरी करणारेही आहेत; परंतु आरोग्यसेवा क्षेत्रात बहुतांश लोक काम करतात. कोणत्याही रुग्णालयात ख्रिश्चन समाजातील महिला अथवा पुरुष रुग्णसेवेत दिसतात. रुग्णांची सेवा हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. समाजात काही उच्चशिक्षित लोकही आहेत. डॉक्टर, शिक्षक, वकील, अभियंते झालेले समाजबांधवसुद्धा आहेत. तेसुद्धा त्यांच्या क्षेत्रात समाजाची सेवा करतात.
विविध धार्मिक उपक्रम राबविण्याबरोबरच सामाजिक कार्यातही या समाजाचा सहभाग असतो. तसेच काळेवाडीत अल्फान्सा, आकुर्डीत सेंट उर्त्सुला, मोहननगर चिंचवड येथे सेंट अॅनड्र्यूज, रूपीनगरातील सेंट पीटर, काळेवाडीतील निर्मल बेथनी, चिंचवडगाव आणि थेरगावातील इंन्फट जिजेस अशा विविध इंग्रजी माध्यमाच्या शाळा अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. तसेच दापोडीतील विनीयार्ड चर्चच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम आणि वैद्यकीय सेवेचेही काम केले जात आहे. सेवाभाव आणि माणुसकी जपण्याचे काम ख्रिश्चन बांधव करीत आहेत.
नाताळची लगबग
पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत पिंपरी, सांगवी, दापोडी, निगडी, काळेवाडी, रहाटणी, आकुर्डी येथे ख्रिस्तीबांधवांची लक्षणीय वस्ती आहे. याठिकाणी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा केला जातो. शहरात मोठ्याप्रमाणावर चर्च उभारण्यात आले. शहरातील पहिले चर्च म्हणून ओळखले जाणारे सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त आकर्षक सजावट केली आहे. नाताळनिमित्त देहूरोड, किवळे व विकासनगर परिसरातील सर्व चर्चमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मोठा उत्साह दिसून येत आहे. जन्मोत्सवानिमित्त चर्चच्या इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, विविध धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. नाताळ सणानिमित्त तळेगाव परिसरातील सर्वांत जुनी १२८ वर्षांची परंपरा लाभलेला, तळेगाव स्टेशनचा मेथडीस्ट सेन्टेनरी चर्च सजला-धजला असून, १३ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी चर्चमार्फत ज्येष्ठ नागरिक संघटना, गरीब मुलं पालक-दत्तक योजना, तसेच हृदरोगासारख्या गंभीर रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली जाणार आहे.
परंपरा १२८ वर्षांची
तळेगाव परिसरातील सर्वांत जुनी १२८ वर्षांची परंपरा लाभलेला, तळेगाव स्टेशनचा मेथडीस्ट सेन्टेनरी चर्च सजला-धजला असून, १३ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चर्चचे मुख्य धर्मगुरू रेव्ह. जोसेफ ढालवाले यांनी दिली.
नाताळच्या पूर्वसंध्येला तळेगाव स्टेशनच्या बीएसएनएल कार्यालयाशेजारील मेथडीस्ट मराठी सेन्टेनरी चर्चमध्ये रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून, नाताळच्या दिवशी सकाळी १० वाजता मुख्य प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य धर्मगुरू या निमित्ताने समाजबांधवांना संबोधित करणार आहेत. येशू ख्रिस्त जन्मसोहळाही आयोजित करण्यात आला आहे. १३ डिसेंबर रोजी संडेस्कूल स्पर्धेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यासाठी राज्यभरातून जवळपास ७०० समाजबांधवांनी हजेरी लावली. त्यानंतर चर्च डेकोरेशन, नाताळ भक्ती, सहभोजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चालूच असून, येथून पुढेही १ जानेवारीपर्यंत सहल, सहभोजन, विविध स्पर्धा, अप्पूघर सहल, कॅम्पफायर, विविध गुणदर्शन, संगीत रजनी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नववर्ष भक्ती आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. चर्चचे मुख्य धर्मगुरू रेव्ह. जोसेफ ढालवाले यांनी नाताळ आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या असून, जास्तीत जास्त समाजबांधवांनी या कार्यक्रमांत सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चर्चचे सचिव सिनाय मसीदास, सुहास शेरे, तसेच अन्य समाजबांधव प्रयत्नशील आहेत.
नाताळनिमित्त देहूरोड, किवळे व विकासनगर परिसरातील सर्व चर्चमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मोठा उत्साह दिसून येत आहे. जन्मोत्सवानिमित्त चर्चच्या इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
विकासनगर येथील सेंट जोसेफ मालान्कारा कॅथलिक चर्चची स्थापना १५ वर्षांपूर्वी झाली असून, या ठिकाणी रेव्ह पॉल नवीन हे फादर आहेत. चर्च परिसरात आत व बाहेर आकर्षक सजावट करण्यात येत आहे. नाताळनिमित्त बिशप थॉमस मर अन्थानियस हे होली माससाठी येणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री प्रभू येशू यांचा जन्मोत्सव कार्यक्रम, सामुदायिक गायन, एकमेकांना भेटवस्तू देणे आदी कार्यक्रमांचे नियोजन केले होते. चर्चची व्यवस्था व्यवस्था समिती पाहत असून, दर रविवारी चर्चमध्ये होली मास आयोजन करण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी सातला प्रार्थना घेण्यात येत असल्याचे समितीचे जोन जोस यांनी सांगितले.
सेंट मेरी कॅथलिक चर्चची स्थापना २०००मध्ये झाली असून, या ठिकाणी चर्चची आकर्षक इमारत बांधण्यात आली आहे. चर्चच्या सर्व भागात सजावट करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मास, प्रभू येशू यांचा जन्मोत्सव, गायन, केक कापणे, सर्वांना वाटणे, सर्व बांधवांनी एकत्र येत उत्सव साजरा करणे आदी कार्यक्रमांची तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. चर्चमध्ये दर रविवारी, बुधवारी मासचे आयोजन करण्यात येते. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी प्रार्थना घेण्यात येते. जोसेफ हे फादर आहेत. देहूरोड येथील ईमान्युएल तमिळ मेथोदिस्ट चर्च हा चर्च मुंबई विभागीय अंतर्गत येत असून, येथील पास्टर रेव सायसील, तर सचिव जस्बीन मुत्तू आहेत. तेवीस डिसेंबरपासून येथील चर्चमध्ये जन्मोत्सवाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. नाताळच्या दिवशी सकाळी मासचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरला मध्यरात्री मास कार्यक्रम नियोजन करण्यात आले आहे.
आकर्षक सजावट,
सुंदर नक्षीकाम
पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले चर्च म्हणून ओळखले जाणारे सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त आकर्षक सजावट केली आहे. सुंदर नक्षीकाम व आकर्षक काचेच्या डिझाइनमध्ये चर्चला रंगरंगोटी केली आहे. चर्चची आकर्षक कमान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चर्चचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात आलेला आहे. जन्मापासूनचे चित्रीकरण चर्चमध्ये केले आहे. चर्चची स्थापना १९५९मध्ये झाली. १९६९मध्ये रेव्ह. अॅन्थोनी लोबो यांनी चर्चच्या कलाकुसरीचे काम केले आहे. बिशप अँड्री डिसोझा यांनी चर्चच्या मूळ कामकाजात मदत केली. एका वेळी ७५० जण बसतील, एवढे भव्य चर्च आहे. चर्चचे सातशेहून अधिक सभासद आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर असल्याने ख्रिस्ती बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सांताक्लॉजला घरोघरी जाऊन उत्सवासाठी आमंत्रण देण्यात येते. दर रविवारी सकाळी ९ला व सायंकाळी ६.३०ला येशूसाठी प्रार्थना केली जाते. ख्रिसमसनिमित्त गरिबांना अन्नदानवाटप करण्यात येते. ख्रिसमसनिमित्त चर्चला रोषणाई करण्यात आली आहे. आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
‘रेस्टोरेशन सेंटर चर्च’
पिंपरीतील नेहरूनगर येथे आॅक्टोबर २०१० रोजी ‘रेस्टोरेशन सेंटर चर्च’ची स्थापना झाली. सध्या चर्चमध्ये नाताळ उत्सवाची लगबग आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनावर नाटिका बसवणे, गीतगायन, नृत्य सादरीकरण आदी कार्यक्रमाची तयारी ख्रिस्ती बांधव करीत आहे.
ख्रिस्ती सणांव्यतिरिक्त सामाजिक कार्यही चर्चद्वारे केली जातात. दुष्काळग्रस्तांसाठी मदत करणे, गरीब लोकांना जगण्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याची व्यवस्था करणे आदी उपक्रम चर्चद्वारे राबविले जातात.
सेंट इग्निशियस चर्च
ब्रिटिश काळाची पार्श्वभूमी लागलेले सेंट इग्निशियस चर्च शंभर वर्षांनंतरही दिमाखात उभे आहे. १९९३ मध्ये याचा जीर्णोद्धार झाला. अनेक पिढ्या आणि काळानुरूप झालेले बदल पाहिलेल्या या चर्चने आजही ओळख कायम ठेवली आहे. कॅथॉलिक संप्रदायाचे नागरिक येथे प्रार्थना करतात. ब्रिटिश सैन्याची छावणी १८७१ मध्ये पुण्यात दाखल झाली. त्या वेळी ब्रिटिश सैन्यामध्ये ख्रिस्ती सैनिकांचा मोठा सहभाग होता. सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना उपासनेसाठी पुण्यातील चर्चमध्ये जावे लागत असे.
कॅथॉलिक पंथाची उल्लेखनीय कामगिरी
ख्रिश्चन धर्मातील रोमन कॅथॉलिक पंथाच्या बांधवांची शहर आणि जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. या पंथाच्या शिक्षण संस्थेत गुणवत्तेमुळे येथे प्रवेशासाठी प्रत्येक वर्षी पालकांची झुंबड उडालेली असते. शहरातील विविध भागात या पंथाचे लोक मोठ्याप्रमाणावर वास्तव्यास आहेत. ख्रिश्चन धर्मामध्ये रोमन कॅथॉलिक हा महत्त्वाचा पंथ आहे. यातील ख्रिश्चन बांधव रोम (इटली) येथील पोप यांना धर्मगुरू मानतात. कॅथॉलिकचा मूळ अर्थ ‘व्यापक’ आहे. जगभरात या पंथाचे बांधव राहतात.
या पंथाच्या सेंट झेव्हिअर्स व होली क्रॉस अशा दोन शाळा आहेत. या दोन्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा पन्नास वर्षांपूर्वीच्या आहेत. राधानगरी रोडवर अल्फान्सो वृद्धाश्रम आहे. बावड्यात पोलीस मैदानाजवळ चर्च आहे. येथे विविध कार्यक्रम होतात.
‘प्रॉटेस्टंट पंथ’
पवित्र शास्त्राच्या (बायबल) आधारे धर्माचे पालन करणारे ख्रिश्चन समाजातील लोक हे प्रॉटेस्टंट पंथातील असतात. येशू ख्रिस्त यांच्या अनुसरणाने ते कार्यरत असतात. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १५ हजार ख्रिस्ती समाजबांधव हे प्रॉटेस्टंट पंथाचे आहेत. कोल्हापूर चर्च कौन्सिल हे त्यांचे धर्मपीठ आहे. त्याअंतर्गत ६० चर्च आहेत. कोल्हापूर शहरातील ख्रिस्ती समाजातील बहुतांश लोक हे प्रॉटेस्टंट पंथाचे असल्याची माहिती कौन्सिलचे कार्यकारी सचिव, पास्टर रेव्ह. डी. बी. समुद्रे यांनी दिली.