गांधीजींकडून दारूबंदीचा संदेश !, शहर आज चकाचक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:38 AM2017-10-02T03:38:31+5:302017-10-02T03:38:37+5:30

दारूपासून मुक्ती हीच राष्ट्रभक्ती... व्यसनाचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार... असे म्हणत खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रस्त्यावर उतरून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

The message of drinking liquor from Gandhiji, the city will be shocking today | गांधीजींकडून दारूबंदीचा संदेश !, शहर आज चकाचक होणार

गांधीजींकडून दारूबंदीचा संदेश !, शहर आज चकाचक होणार

Next

पुणे : दारूपासून मुक्ती हीच राष्ट्रभक्ती... व्यसनाचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार... असे म्हणत खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रस्त्यावर उतरून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. गांधीजींच्या वेशातील कलाकाराने तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर अ‍ॅड. सिद्धार्थ धेंडे यांसह लोकप्रतिनिधींनी हातामध्ये फलक घेत जनजागृती केली. व्यसनमुक्त शहर बनविण्यासाठी दारू हद्दपार करण्याचा संकल्प लोकप्रतिनिधींसह पुणेकरांनी स्वाक्षरी मोहिमेने केला.
आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नीलिमा खाडे, अ‍ॅड. असिम सरोदे, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे आदी उपस्थित होते.
टिळक म्हणाल्या, ‘व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवे. दारूसोबतच ई-व्यसन हे तरुणांना मृत्यूकडे नेणारे ठरत आहे, यासारखी दुसरी शोकांतिका नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या व्यसनाधीनतेतून पुणे शहर व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करू या.’ धेंडे म्हणाले, ‘सुमारे ९० टक्के लोक व्यसनांमुळे आजारी पडतात. विदारक स्थिती थांबविणे काळाची गरज आहे. पुणे शहर आपण स्मार्ट करीत आहोत, त्यासोबतच व्यसनमुक्त स्मार्ट नागरिक देखील तयार व्हायला हवे. दारूबंदीचा निर्णय लोकप्रतिनिधींनी एकमताने मंजूर करायला हवा.’ दुधाणे म्हणाले, ‘तरुणाईसह महिलांना व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न
केले जाणार आहेत. तसेच विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम केले जातील. स्वाक्षरी फलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखविण्यात येणार आहे.’ दारूला हद्दपार करण्यासाठी स्वाक्षरी मोहीमदेखील राबविण्यात आली.

शहर आज चकाचक होणार
महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस स्वच्छतेचा असणार आहे. सामाजिक संस्थांतर्फे ठिकठिकाणी हा दिन साजरा होणार आहे. भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांतर्फे सोमवारी (दि. २) चतु:शृंगी परिसरात सकाळी ७ ते ९.३० या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानामध्ये जैन संघटनेतर्फे शिक्षणासाठी आणलेल्या महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयातील मुले सहभागी होणार आहेत. तसेच मेळघाट व ठाणे येथील आदिवासी विद्यार्थ्यांचाही सहभाग असेल. अभियानाच्या समारोपास पालकमंत्री गिरीश बापट, चतु:शृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर अनगळ, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था उपस्थित राहतील. लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे 'स्वच्छ व सुंदर एसटी स्टॅन्ड प्रकल्प' राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी (दि. २) सकाळी १० वाजता फलाट क्रमांक ३, स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे होणार आहे. याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, लायन्स ग्लोबल सर्व्हिस टीमचे विजय सारडा, स्वारगेट एसटी स्टॅन्डचे वरिष्ठ आगारप्रमुख सुनील भोकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी डस्टबिन वाटप, स्वच्छता जागृतीचे स्टिकर्स आणि पथनाट्य सादरीकरण होणार आहे.

Web Title: The message of drinking liquor from Gandhiji, the city will be shocking today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.