‘इक्रो फ्रेंडली’चा संदेश
By admin | Published: October 20, 2015 03:09 AM2015-10-20T03:09:12+5:302015-10-20T03:09:12+5:30
फराळ, मिठाई, सुका मेवा असे मिष्ठान्न, फटाक्यांची आतषबाजी, नवे कपडे, रोषणाई अशी धमाल म्हणजे दिवाळी. हा सण अधिक आनंददायी आणि पर्यावरणपूरक (इक्रो-फ्रेंडली) करण्याचा
पिंपरी : फराळ, मिठाई, सुका मेवा असे मिष्ठान्न, फटाक्यांची आतषबाजी, नवे कपडे, रोषणाई अशी धमाल म्हणजे दिवाळी. हा सण अधिक आनंददायी आणि पर्यावरणपूरक (इक्रो-फ्रेंडली) करण्याचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. महागड्या सुका मेवा बॉक्सला पर्याय म्हणून कमी किमतीतील इक्रो-फ्रेंडली बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून घराघरांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहचविला जाणार आहे.
दिवाळीत मिठाई व सुका मेवा भेट देण्याची पद्धत आहे. रंगीबेरंगी आकर्षक वेष्टणाच्या बॉक्समध्ये मिठाई आणि सुका मेवा असतो. बऱ्याचदा त्यातील पदार्थांपेक्षा बॉक्सची किंमत अधिक असते. पुठ्ठ्याचे बॉक्स तयार करण्यासाठी लाखो वृक्षांची कत्तल केली जाते. अमेरिकेतील ‘ईपीए’ या पर्यावरण संस्थेने केलेल्या सन २०१०च्या सर्वेक्षणानुसार एक टन वजनाचे बॉक्स तयार करण्यासाठी एकूण १७ झाडे तोडावी लागतात. दिवाळीत मिठाई, तसेच फटाके, कपड्यांसाठी देशभरात मोठ्या प्रमाणात बॉक्सचा वापर होतो. यावरून किती मोठ्या संख्येने वृक्षतोड होते, ते धक्कादायक चित्र समोर येते. हे बॉक्स थेट कचऱ्यात पडून प्रदूषणात भर घालतात.
या बॉक्सला पर्याय म्हणून येथील ‘ग्रीनऐनजी रिव्होर्लेशन’ या पर्यावरणप्रेमी संस्थेने सुपारीच्या पानापासून तयार केलेले आकर्षक बॉक्सची निर्मिती केली आहे. ६ बाय ६ ते १० बाय १० इंच आकारातील बॉक्स आहेत. त्याला रंगीत दोरी आणि कापडी फुलांची सजावट केली आहे. एका बॉक्सची किंमत ८ ते १५ रुपये इतकी अल्प आहे. पाच ते दहा बॉक्स एकत्रित हवे असल्यास तागाची आकर्षक पेटी आहे. या इक्रो फ्रेंडली सुका मेवा बॉक्स अनेकांना भेट देता येणार आहेत. कंपन्या, उद्योग आणि कार्यालयांत अधिकारी, कर्मचारी, कामगारांना या बॉक्स अधिक उपयुक्त ठरणार आहेत. त्यास अनेकांनी पसंती दिली आहे.
या बॉक्समध्ये रासायनिक पदार्थ न वापरता, नैसर्गिकपणा जपलेला सुका मेवा आहे. यामुळे आरोग्यास अपाय होणार नाही. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. हे बॉक्स मातीत मिसळून खत तयार होत असल्याने पर्यावरणाची हानी होत नाही. इक्रो फ्रेंडली वस्तू वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळणार असून, या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
स्मार्ट सिटीत या पद्धतीने इक्रो फ्रेंडली उपक्रमाचा अंगीकार केला गेला पाहिजे. गणेशोत्सवात इक्रो फ्रेंडली मूर्तीचा आग्रह धरला जातो. त्या पद्धतीने दिवाळीतही पर्यावरणाची हानी न होण्याबाबतचे उपक्रम राबविले पाहिजेत. या दृष्टीने सुका मेवा बॉक्सची अभिनव उपक्रम राज्यात प्रथमच राबविली आहे. त्याचा वापरासाठी जनजागृती केली जात आहे. शहरातील काही अनाथ आश्रमात सुका मेवा आणि उटणे- साबणाचे बॉक्सचे मोफत वाटप केले जाणार आहे. - संतोष इंगळे, विवेक कुलकर्णी,
संचालक, ग्रीन एनर्जी रिव्होर्लेशन