भित्तीचित्रातून दिला राम नदी पुनरुज्जीवनाचा संदेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:57+5:302021-03-16T04:10:57+5:30
औंध, बाणेर, बावधन, पाषाण या परिसरातील पुणे महापालिकेच्या १२ शाळांबरोबरच बालाजी मुरकुटे विद्यालय, मॉडर्न हायस्कूल, चेतन दत्ताजी गायकवाड पेरिविंकल ...
औंध, बाणेर, बावधन, पाषाण या परिसरातील पुणे महापालिकेच्या १२ शाळांबरोबरच बालाजी मुरकुटे विद्यालय, मॉडर्न हायस्कूल, चेतन दत्ताजी गायकवाड पेरिविंकल आदी सुमारे २० शाळांमधील ४0 भिंती रंगविल्या आहेत. किर्लोस्कर न्यूमॅटिक्स कंपनी लि.च्या पुढाकारातून 'राम नदी शाळा प्रकल्पा’ची सुरुवात राम नदी पुनरुज्जीवन अभियानाअंतर्गत नुकतीच केली आहे. भित्तिचित्रांच्या सुरवातीच्या भागात प्रदूषण, अतिक्रमण, सांडपाणी इत्यादी समस्यांनी वेढलेली राम नदी दाखविली आहे. तर चित्राच्या उर्वरित भागात शाळांतील मुले नदीची स्वच्छता करताना, झाडे लावताना, जलचरांना संरक्षण देताना दिसतात. पुणे महापालिकेच्या सहकार्याने आणि महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे यांच्या पुढाकारातून प्रकल्प साकारला आहे.
प्रकल्पाविषयी सहस्त्रबुध्दे म्हणाल्या की, "दुर्लक्षित राम नदीची ओळख नदीकाठच्या शाळांमधील मुलांना, शिक्षकांना झाली पाहिजे. मला खात्री आहे की, शाळेतील मुलांना राम नदीच्या स्वच्छतेचा मंत्र पटला, तर ते कुटुंबातील अन्य सदस्यांना या कामात सहभागी करून घेतील."
या प्रकल्पाबद्दल ‘किर्लोस्कर’ कंपनीचे अधिकारी डॉ. सुरेश मिजार म्हणाले की, “गेली अनेक वर्षे आम्ही शालेय मुलांमध्ये पर्यावरण जागृतीचे काम करत आहोत. राम नदीकाठच्या शालेय विद्यार्थांना नदी, तिचे आरोग्य, पर्यावरण रक्षणाचे महत्त्व या प्रकल्पामधून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदी अस्वच्छच होणार नाही, यासाठी हे उद्याचे नागरिक जागृत असतील हा आम्हाला विश्वास आहे."
या ४० भिंतीवर प्रभावी चित्रांचे रेखाटन 'क्राफ्टशिफ्ट इव्हेंट्स'चे दीपक शिंदे आणि त्यांच्या १० कलाकारांनी केले आहे. भित्तीचित्रांचा हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी राम नदी पुनरुज्जीवन अभियानाचे वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड, नयनीश देशपांडे, सुवर्णा भांबुरकर, अर्जुन नाटेकर यांनी विशेष प्रयत्न केले.