बीजगाेळे निर्मितीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 07:58 PM2018-06-16T19:58:01+5:302018-06-16T19:58:01+5:30
पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोसायटी फॉर सायन्स इन्व्हाॅरमेंट अँड पीपल (सेप) आणि भवताल मॅगझीन यांच्या वतीने बाणेर, औंध, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये बीजगोळे (सीडबॉल) निर्मिती उपक्रम राबवण्यात आला.
पुणे : पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोसायटी फॉर सायन्स इन्व्हाॅरमेंट अँड पीपल (सेप) आणि भवताल मॅगझीन यांच्या वतीने बाणेर, औंध, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये बीजगोळे (सीडबॉल) निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सहभागी झाले होते . बालेवाडी येथील कम्फर्ट झोन सोसायटीमध्ये या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे शहराची वाटचाल ही स्मार्ट सिटीकडे हाेत अाहे. त्यात शहर स्मार्ट हाेत असताना निसर्गाचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे अाहे. लहान मुलांना निसर्गाचे, वृक्ष संवर्धन करण्याबाबतचे महत्त्व कळावे या हेतूने बीजगाेळे तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात अाला. यावेळी बाेलताना पुणे स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “नागरिकांसोबत बीजगोळे निर्मिती करून पर्यावरणाला हातभार लावतानाच हा उपक्रम राबवताना नागरिकांच्या दारी स्मार्ट सिटीचे काम पोचवून आणि त्यांच्या समस्या, सूचना जाणून उपाययोजना करण्यासाठी त्या विचारात घेतल्या जातील. अशा प्रकारे आम्ही स्मार्ट सिटीच्या विकासकामांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेत आहोत.”
या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी मिशनमध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढवता येणार आहे. तसेच, तयार झालेले बीजगोळे त्या त्या भागात झाडे लावण्यासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागात विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यात आता या हरित उपक्रमाची भर पडणार आहे, असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.
निसर्ग संवर्धनाचा संस्कार
बीजगोळे करताना मातीत, शेणात हात घालावा लागतो. बी हाताळावी लागते. त्यामुळे निसर्गाशी, पर्यावरणाशी जवळीक निर्माण होते. झाडाशी एक प्रकारचे नाते निर्माण होते. यातून सर्वांवरच संस्कार संवर्धनाचा घडतो. विशेषत: मुलांमध्ये याचा अधिक फायदा पाहायला मिळतो. त्याशिवाय गटामध्ये हा उपक्रम राबवला तर सांघिक भावना जोपासली जाते.
बीजगोळे म्हणजे काय?
बीजगोळे म्हणजे सुकलेले शेण व माती यांचा चिखल करून त्यामध्ये बी टाकायचे. त्याचा गोळा करून तो सुकवायचा आणि पावसाळ्यात तो निसर्गात टाकायचा. बीजगोळे तयार करण्यासाठी चिंच, बहावा, आपटा, कांचन, खैर, तामण, बाभूळ, आवळा, पारिजातक, बकुळ अशा स्थानिक झडांच्याच बिया वापरल्या जातात.
बीजगोळ्याचे फायदे
नुसत्या बिया टाकल्यास त्याला कीड, बुरशी लागू शकते. तसेच, त्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाण्याची शक्यता असते. याशिवाय किडे, मुंग्या बिया खाऊन शकतात. त्यामुळे बिया रुजण्याची शक्यता कमी होते. बीजगोळ्यांमुळे बी रुजण्याची प्रमाण वाढते. कारण, मातीमुळे बी संरक्षित होते. तसेच शेणामुळे पोषक घटकही मिळतात.