नळजोडांना बसणार मीटर : पाण्याच्या प्रत्येक थेंबाला पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 02:39 AM2018-11-06T02:39:55+5:302018-11-06T02:40:07+5:30
महापालिकेने शहरातील प्रत्येक नळजोडाला मीटर बसवण्याचे काम त्वरित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व व्यावसायिक नळजोडांना मीटर बसवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजावे लागतील.
- राजू इनामदार
महापालिकेने शहरातील प्रत्येक नळजोडाला मीटर बसवण्याचे काम त्वरित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व व्यावसायिक नळजोडांना मीटर बसवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजावे लागतील.
पाणीप्रश्नाबाबत महापालिकेने गांभीर्याने विचार सुरू केला आहे. पाण्याला मीटर बसवून त्याप्रमाणे बिल आकारणी सुरू केली, तर पाण्याची मोठी बचत होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
समान पाणी योजनेतच (२४ तास पाणी) प्रत्येक नळजोडाला मीटर या कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ते त्वरित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात फक्त व्यावसायिक वापराच्या नळजोडांना मीटर बसवण्यात येतील. असे एकूण ४५ हजार नळजोड आहेत. त्या सर्वांना येत्या डिसेंबरपर्यंत मीटर बसवण्याचे काम करण्यात येईल. त्यानंतर या नळांमधून पडणारे सर्व पाणी मोजले जाईल. दुसऱ्या टप्प्यात सर्व घरगुती नळजोडांनाही मीटर बसवण्यात येईल. जानेवारीत या कामाला सुरुवात होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरातील एकूण नळजोडांची संख्या १ लाख ७० हजार आहे. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत.
जलवाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात असे नळजोड सापडले असून, त्यांच्याकडून दंड घेऊन ते अधिकृत करून मीटर बसवण्यात येतील. ही सर्व मीटर अत्याधुनिक असून त्यांना संवेदक (सेन्सर) बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मीटरमध्ये कसलीही छेडछाड झाली की, त्याची माहिती लगेचच पाणी पुरवठा विभागाला कळणार आहे. पाणी अचूक मोजले जाईल, अशी रचना यात आहे. त्यामुळे नळ सोडला व पाणी आले की त्याची नोंद मीटरवर होणार आहे. आता जी नळपट्टी द्यावी लागते आहे ती नळजोड किती इंचाचा व कोणत्या वापराचा आहे त्यावर आधारलेली आहे. ती अत्यंत किरकोळ आहे. मीटर बसवल्यानंतर मात्र विजेचे बिल द्यावे लागते त्याप्रमाणे दरमहा पाण्याचेही बिल नागरिकांना द्यावे लागणार आहे. ते वसूल करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा वापरायची की खासगी यंत्रणा वापरायची, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पुणे शहराचे विभाग करण्यात आले असून, एका विभागात २ ते ३ हजार नळजोड अशी रचना करण्यात आली आहे.
समान पाणी योजना मंजूर होऊन, त्यासाठी २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढून काम अजून सुरू झालेले नाही, या योजनेत शहराच्या वेगवेगळ्या विभागात एकूण ८२ पाणी साठवण टाक्या बांधण्यात येत आहेत. त्यातील ५१ टाक्यांचे काम सुरुही झाले आहे. त्याला गती देण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. शहरात सुमारे १ हजार ८०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यासाठीची सर्वेक्षणही पूर्ण होत आले असून, तेही काम लगेचच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीही शहराचे वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत.
1 पुणे शहराला रोज १५०० ते १६०० एमएलडी पाणी लागते. ते आता १३५० एमएलडीवर आले आहे. दिवाळीनंतर तेवढेच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका पदाधिकाºयांना सांगितले असले, तरी लेखी आदेश अजूनही जलसंपदाला आलेले नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर फक्त ११५० एमएलडी पाणी दिले जाणार हे निश्चित आहे.
2पाण्याची बचत करण्यासाठी पोहण्याचे तलाव, वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मीटर बसवण्याला प्राधान्य...
समान पाणी योजनेत मीटर बसवण्याचे काम अंतर्भूत आहेच. त्यामुळे ते प्राधान्याने करण्यात येईल. जेवढे पाणी मिळेल ते जपून, काटकसरीने वापरायचे असे महापालिकेचे धोरण आहे. त्यामुळेच पाणी वाचवण्याचे सर्व उपाय करण्यात येतील. पुढील जूनपर्यंत पाणी पुरवायचे असल्याने असे करावेच लागणार आहे.
- सौरभ राव,
आयुक्त, महापालिका