मीटरने पाणी योजना रखडली, केवळ नवीन जोडण्यांनाच मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:54 AM2018-06-20T01:54:32+5:302018-06-20T01:54:32+5:30
चोवीस तास पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली आहे.
राजानंद मोरे
बारामती : ‘चोवीस तास पाणीपुरवठा योजने’अंतर्गत प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली आहे. सध्या केवळ नवीन नळजोडांनाच मीटरने पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या जोडांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
मागील काही वर्षांत बारामती शहराचा विकास वेगाने झाला आहे. नागरीकरण वाढल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा देणेही आवश्यक आहे.
त्यामध्ये सर्वांना समान पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पूर्वीच्या मातीच्या तलावाचे काँक्रिटीकरण करण्यात आले. नवीन तलाव बांधण्यात आला. त्यामुळे आता बारामतीकरांना पाणीटंचाई भासत नाही. तसेच, २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे धोरण आहे.
त्यानुसार दि. १ एप्रिल २०१५ पासून नवीन नळजोडाला मीटरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत
सुमारे २,२०० मीटर बसविण्यात आले आहेत. प्रत्येक नवीन जोडाला मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.जुन्या नळजोडांनाही मीटर बसविण्यात येणार आहेत. शहरात सुमारे ६ हजार ५०० जुने जोड आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा खूप जुनी आहे. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी सर्व पाईपलाईनची यंत्रणा नव्याने उभारावी लागेल.
याखेरीज, मीटर बसविणे शक्य होणार नाही. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही योजना रखडली आहे.
>काहींना बिलच नाही
बारामतीच्या वाढीव हद्दीतील बहुतेक नवीन नळजोडांना मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरचे बिल नगरपालिका प्रशासनाकडून संबंधितांना पाठविले जाते. पण, काहींना मागील वर्षभरात पाणीवापराचे बिलच मिळाले नसल्याचे समोर आले आहे.
प्रशासनाकडून संबंधितांकडे कधी विचारणा केली नसल्याचे एका नागरिकाने सांगितले. त्यामुळे नगरपालिकेकडून राबविल्या जात असलेल्या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, असे प्रकार होत नाहीत, याबाबतची तपासणी केल्यानंतर प्रत्यक्ष स्थिती कळेल, असे सांगण्यात आले.
>कितीही बिल भरायला तयार
पाणीमीटर बसविल्यानंतर पाण्याचा वापर कमी होणे अपेक्षित आहे; पण काही नागरिकांकडून पाण्याचा बेसुमार वापर होतच आहे. पाणीवापराचे कितीही बिल आले, तरी हे नागरिक भरण्यास तयार आहेत. तर, काही नागरिकांनी पाण्याचा वापर कमी केल्याचे सकारात्मक चित्र आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
>सोसायट्यांमध्ये वाद
नवीन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नवीन जोडाबरोबरच मीटरही बसविण्यात आले आहेत. पण, हे मीटर मुख्य जोडणीला असल्याने प्रत्येक सदनिकाधारकाच्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे काही सोसायट्यांमधील सदस्यांमध्ये पाणीवापरावरून वाद होत आहेत. काही सदस्य जास्त वापर करीत असल्याने त्याचा भुर्दंड इतरांना सोसावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
जुन्या नळजोडांना मीटर बसविण्याचे नियोजन आहे. हे मीटर नागरिकांनाच बसवावे लागतील. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- योगेश कडूसकर, मुख्याधिकारी,
बारामती नगरपालिका