#MeToo: 'अंधारात लपलेल्या सैतानी प्रवृत्तींचे दहन करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 01:28 AM2018-10-27T01:28:40+5:302018-10-27T06:50:33+5:30

सैतानी प्रवृत्ती अंधारात गैरकृत्ये करतात. लाजेखातर मुलगी बोलणार नाही, हा समज हेच त्यांचे सर्वांत मोठे शस्त्र बनते. या प्रवृत्तींना उजेडात आणून त्यांचे दहन केले पाहिजे.

#MeToo: 'Burn the Satanic Attacks Hidden in the Dark' | #MeToo: 'अंधारात लपलेल्या सैतानी प्रवृत्तींचे दहन करा'

#MeToo: 'अंधारात लपलेल्या सैतानी प्रवृत्तींचे दहन करा'

googlenewsNext

पुणे : सैतानी प्रवृत्ती अंधारात गैरकृत्ये करतात. लाजेखातर मुलगी बोलणार नाही, हा समज हेच त्यांचे सर्वांत मोठे शस्त्र बनते. या प्रवृत्तींना उजेडात आणून त्यांचे दहन केले पाहिजे. कारण, ‘लाथों के भूत बातों से नहीं मानते।’ आजवर अंधारात लपलेल्या विकृती मी टूच्या निमित्ताने उजेडात येत आहेत, अशा शब्दांत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने वाईट प्रवृत्तींवर निशाणा साधला.
एनईसीसी आणि युनिसेफच्या सहयोगाने आयोजित लोकमत वुमेन समीटमध्ये ‘मी टू ते वुई टुगेदर’ या विषयावरील परिसंवादात तनुश्री बोलत होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, पुरुष हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या बरखा ट्रेहान यामध्ये सहभागी झाल्या होत्या. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. या चळवळीतून पुढच्या पिढयांना न्याय मिळेल. आम्हाला जे भोगावे लागले तो त्रास त्यांना होऊ नये, यासाठीची ही चळवळ, अशा शब्दांत तनुश्री दत्ता यांनी मी टू चळवळीमागचे मर्म उलगडले.
‘मी ज्या काळात माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलले, त्या वेळी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्ह्याची नोंदणी केली. यात माझा काय दोष? त्या वेळी उघडपणे कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. त्या घटनेने मला नैराश्याच्या गर्तेत ढकलले आणि बॉलिवूड सोडण्यास भाग पडले. त्या वेळी अनेकांनी पडद्यामागून समर्थन दिले; मात्र खुलेपणाने कोणीही माझी बाजू घेण्यास पुढे आले नाही. दोन वर्षांत ३० ते ४० चित्रपटांच्या आॅफर आल्या होत्या. मी त्या चित्रपटांच्या आॅफर स्वीकारल्या असत्या तर माझ्यावर प्रसिद्धी स्टंट केल्याचा आरोप झाला असता. अखेर मी निराश झाले आणि इंडस्ट्री सोडून निघून गेले. आता कुठे समाजात जागरूकता आली आहे, याचे समाधान वाटते. मी याकडे लढाई म्हणून बघत नाही. मी घडणाºया घटनांना फक्त तोंड देते. मी न्यायासाठी आशावादी आहे; पण आता बॉलिवूडमध्ये परतण्याचा कोणताही विचार नाही’, असेही तनुश्रीने स्पष्ट केले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी समाजातील स्त्री-पुरुष विषमतेकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, ‘‘स्त्रियांची लढाई ही काही पुरुषांच्या विरोधात नाही तर ती अन्यायाविरोधात आहे. बायका बोलू लागल्या, ही सकारात्मक बाब आहे. स्वत:चा फायदा कोणालाही करून घ्यायचा नसतो. आपल्याबरोबर घडलेल्या घटनेबाबत कोणाशी बोलल्यावर अर्धे दु:ख हलके होते. चांगल्या आणि सच्छील पुरुषांनी या चळवळीला घाबरण्याची गरज नाही. कारण, कर नाही त्याला डर कशाला?’’
बरखा ट्रेहान म्हणाल्या, ‘‘स्त्रियांच्या बाजूने सर्व अधिकार असल्याने आता पुरुषांची गळचेपी होताना दिसत आहे. दर वेळी महिलांवर अन्याय होतो, अशी ओरड केली जाते. यामुळे पुरुषांना मात्र न्याय मिळविण्यासाठी आता झगडावे लागत आहे.’’ या परिषदेचे बायो आयुर्वेदिक हे वेलनेस पार्टनर, ढोले-पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग हॉस्पिटॅलिटी पार्टनर, पुला हे कम्युनिटी पार्टनर आणि फिकीफ्लो हे फॉर्म पार्टनर आहेत.
>तनुश्री दत्ता-बरखा ट्रेहान यांच्यात उडाली चकमक
देशात ‘मी टू’ चळवळ सुरू करणाºया तनुश्री दत्ता आणि पुरुष हक्कांसाठी लढणाºया कार्यकर्त्या बरखा ट्रेहान यांच्यात चर्चेदरम्यान चांगलीच चकमक उडाली. तनुश्री म्हणाली, ‘‘काही महिलाच अशा चळवळीला बाधा आणत आहेत. मात्र, स्वत:वरील अत्याचाराबाबत खुलेपणाने बोलायला आणि आतला आवाज ऐकयला हिंमत लागते. ही चळवळ स्त्री-पुरुषांच्या विरोधात नाही, तर अन्यायाविरोधात आहे. मी जे काही केले त्यामुळे समाजात नक्कीच बदल होईल, अशी अपेक्षा आहे.’’ सर्व पुरुष रावण नसतात आणि सर्व स्त्रिया सीता नसतात, याकडे लक्ष वेधून बरखा ट्रेहान म्हणाल्या, ‘‘परदेशात मी टू चळवळ अयशस्वी ठरली. त्यानंतर प्रयोग म्हणून ती भारतात राबविण्यात आली. या चळवळीमुळे पुरुषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याच्या कुटुंबाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
चुकीच्या आरोपांमुळे पुरुषांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्या महिला मी टूबद्दल बोलत आहेत, त्या दहा वर्षे का गप्प बसल्या? आरोपी ठरवल्या जाणाºया पुरुषांमध्ये आपले वडील, भाऊ, नवरा असतील, हे विसरून चालणार नाही.’’
>सोशल मीडियामध्ये अनेक वर्षांनी बोलण्यापेक्षा पोलिसांत तक्रार का नोंदवली गेली नाही, असा प्रश्न विचारला जातो. मात्र, त्या-त्या वेळची परिस्थिती वेगवेगळी असते. खुलेपणाने बोलण्याची हिंमत आली याचे
स्वागत केले पाहिजे. हा स्त्री विरुद्ध पुरुष असा लढा नाही, तर शोषणाविरोधात लढा आहे. समाजाची मानसिकता बदलणार नाही, तोवर बदल घडणार नाही.
- विजय दर्डा, चेअरमन,
लोकमत एडिटोरिअल बोर्ड

>लोकमत वुमेन समीट #MeTooबरोबर #WeToo
लोकमत वुमेन समीटमध्ये महिलांच्या विविध प्रश्नांवर शुक्रवारी चर्चा झाली. मादागास्करच्या भारतातील राजदूत मेरी लिओन्टाईन रझांद्रोसा, पद्मश्री सुधा वर्गीस, यूएसके फाउंडेशनच्या उषा काकडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा, मुकुल माधव फाउंडेशनच्या रितू छाब्रिया, रुपाली देशमुख यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. या परिषदेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: #MeToo: 'Burn the Satanic Attacks Hidden in the Dark'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.