#Metoo : मी टू चळवळ पुढील पिढ्यांसाठी - तनुश्री दत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 06:26 PM2018-10-26T18:26:38+5:302018-10-26T18:49:35+5:30
तनुश्री आपली व्यथा मांडताना म्हणाली, ज्याच्यावर प्रसंग ओढावतो त्यालाच त्याची वेदना समजते. मी ज्या काळात माझ्यावर झालेल्या
पुणे - मी टू ही केवळ माझी लढाई नाही आणि पुरुष विरुद्ध महिला असा संघर्षही नाही. हे एक आव्हान असून मला न्याय मिळेल याची पूर्ण खात्री आहेच. पण, यातून पुढच्या पिढ्यांना न्याय मिळेल. आम्हाला जे भोगावे लागले तो त्रास त्यांना होऊ नये, यासाठीची ही चळवळ आहे, अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी मी टू चळवळीमागचे मर्म उलगडले.
लोकमत विमेन समिट २०१८ मध्ये आयोजित मीटू ते वुई टू-गेदर या विषयावरील परिसंवादात तनुश्री बोलत होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, पुरुष हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या बरखा ट्रेहान यामध्ये सहभागी झाल्या होत्या. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते.
तनुश्री म्हणाली, समाजाचे स्वास्थ्य बिघडले असल्याने महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यांच्यापुढे दररोजच्या जगण्याचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे समाजातील पुढारलेल्या महिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी महिलाविरोधी मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी थोडा त्रास झाला तरी चालेल, यासाठीच मी टू ही चळवळ आहे. तनुश्री आपली व्यथा मांडताना म्हणाली, ज्याच्यावर प्रसंग ओढावतो त्यालाच त्याची वेदना समजते. मी ज्या काळात माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलले त्यावेळी पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्ह्याची नोंदणी केली. यात माझा काय दोष? माझ्या पुढाकाराने समाजातील अनेक स्त्रिया बोलत्या झाल्या. त्यांना एक मानसिक आधार मिळाला. याचे समाधान वाटते. दहा वर्षांपूर्वी झालेल्या या प्रसंगात मला माझ्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. मात्र ज्या क्षेत्रात काम करते अशा बॉलिवूड मधून फार कमी प्रमाणात मला पाठिंबा मिळाला. अशी खंत तनुश्री हिने व्यक्त केली. धाडसाने पुढे येऊन पाठीशी उभे राहण्यासाठी एक प्रकारची हिंमत लागते. ती बॉलिवूड मधील फारच कमी लोकांकडे आहे. मी जे काही केले त्यामुळे समाजात नक्कीच बदल होईल अशी अपेक्षा आहे. निदान समाजातील तो पीडित घटक आपल्या वरील अन्यायाकरिता नक्कीच आवाज उठवेल असे वाटते.
राष्ट्रीय महिला नियोजनाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी समाजातील स्त्री पुरुष विषमतेकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, आपल्याला अजून स्त्री पुरुष समानतेची पूर्णपणे जाणीव झाली आहे असे वाटत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांवरील अन्यायाविषयी समाजातून कडाडून विरोध केला जात नाही. स्त्रियांची लढाई ही काही पुरुषांच्या विरोधात नाही तर ती अन्याय विरोधात आहे. अजूनही एखादी महिला पोलीस स्टेशन मध्ये आपली तक्रार नोंदविण्यास गेली असता तिला पोलिसांकडून पुरेसे सहकार्य मिळत नाही.
पुरुष अधिकार संघटनेच्या बरखा तेहांन म्हणाल्या स्त्रीयांच्या बाजूने सर्व अधिकार असल्याने आता पुरुषांची गळचेपी होताना दिसत आहे. दरवेळी महिलांवर अन्याय होतो अशी ओरड केली जाते यामुळे मात्र पुरुषांना न्याय मिळविण्यासाठी आता झगडावे लागत आहे. या मी टू च्या चळवळी मध्ये काही मुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा बरखा यांनी यावेळी केला. जसे प्रत्येक पुरुष देखील राम नाही. तसेच प्रत्येक स्त्री ही देखील सीता नाही अशी टिप्पणी बरखा यांनी केली.