#MeToo: ताकद ‘ती’च्या बोलण्याची
By विजय दर्डा | Published: October 26, 2018 01:15 AM2018-10-26T01:15:15+5:302018-10-26T01:25:50+5:30
‘लोकमत’ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे.
‘लोकमत’ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे. महिलांचे प्रश्न, समस्या आणि त्यांच्या यशोगाथांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने दर वर्षी पुण्यात ‘लोकमत वुमेन समीट’चे आयोजन केले जाते. समाजातील ज्वलंत विषयावर त्यानिमित्ताने चर्चा होते. आजच्या ‘ वुमेन समीट’चा विषयही असाच आहे. महिलांनी सर्व क्षेत्रांत प्रगती केली, यशाची शिखरे सर केली; परंतु त्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्यायत का? रूढीच्या बंधनाखाली जेंडर बायस अजूनही अनुभवावा लागतो का? महिलांच्या सुरक्षेपासून हुंड्यापर्यंत आणि लैंगिक शोषण, छेडछाडीपासून अत्याचारापर्यंत अनेक विषयांत हे स्वातंत्र्य जखडले गेले आहे का? त्यातून बाहेर पडण्याची उपाययोजना काय? या ‘वुमेन समीट’मध्ये समाजाच्या सर्व क्षेत्रांतून मान्यवर महिला उपस्थित आहेत. येथील चर्चेतून काहीतरी ठोस निघावे, की जे समाजापुढे आणि शासनापुढे आपण मांडू शकतो.
महिलांचे मनोबल उंचावत, त्यांचा आत्मविश्वास जागवीत निश्चयाचे बळ त्यांच्या मनात दृढ करण्यासाठी माझी सुविद्य पत्नी सौ. ज्योत्स्ना दर्डा यांच्या कल्पनेतून १९९९मध्ये ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना झाली. महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हेतू त्यामागे होता. विचारांच्या या अभिव्यक्तीचा देशपातळीवर जागर व्हावा, यासाठी सौ. ज्योत्स्ना यांच्या कल्पनेतूनच ‘लोकमत वुमेन समीट’ची सुरुवात झाली. याची सुरुवात पुण्यातून करण्यामागेही विचारपरंपरा आहे. स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून शिक्षणाच्या प्रकाशाने त्यांचे जीवन उजळवून टाकणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची सुरुवात याच मातीतून झाली. सामाजिक रूढी-बंधनातून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे यांची चळवळही येथूनच सुरू झाली. पुण्याच्या याच परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘लोकमत’ने महिलाशक्तीला सन्मान देण्यासाठी ‘ती’चा गणपती या उपक्रमाची सुरुवातही ‘लोकमत’ने पुण्यातूनच केली आहे. पुरोगामित्वाच्या भूमिकेला बळ दिले. ‘आता बास’सारख्या मोहिमांतून नागरी समस्यांवर प्रहार केले.
या वर्षीच्या ‘वुमेन समीट’ची कल्पना ‘मी टू - तीची बोलण्याची ताकद’ ही आहे. महिलांचे हे प्रश्न केवळ आपल्याकडेच नाहीत तर त्याचे स्वरूप वैश्विक आहे. महिलांनी विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. तरीसुद्धा दिवसेंदिवस त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ होत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषणासारख्या घटना घडत आहे. महिलांसाठी असुरक्षित वातावरण तयार होत आहे; पण अंधार दाटल्यासारखा वाटत असताना ‘मी टू’ ही चळवळीसारखी किरणशलाका निघत आहे. लैंगिक शोषण आणि तत्सम प्रकारच्या अत्याचारांना सामोरे जावे लागलेल्या स्त्रियांना मोकळेपणे व्यक्त होता यावे आणि आपले वेदनादायक अनुभव उघडपणे समाजासमोर मांडता यावेत, यासाठी ही चळवळ सुरू झाली. महिलांच्या मुक्त अभिव्यक्तीला ‘लोकमत’ने नेहमीच बळ दिले आहे. लैंगिक अत्याचाराने पीडित महिला मानसिक आणि भावनिकरीत्या कोलमडून जातात. त्यांच्या संवेदना गोठून जातात. निर्णयक्षमता, आत्मविश्वास यावर आघात होतो. त्यामुळेच महिला सक्षमीकरणाची चळवळ पुढे नेतानाची पहिली अट म्हणजे त्यांच्यासाठी भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण तयार करणे; पण त्यापुढे जाऊन महिलांना सामाजिक प्रतिष्ठा, विकासाची समान संधी आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘मी टू ते वुई टुगेदर’पर्यंतचा प्रवास घडविण्यासाठी समाजाची मनोभूमिका तयार करण्यासाठी विचारमंथन होणे गरजेचे आहे.
कुटुंबाची खºया अर्थाने प्रमुख म्हणून महिलांमध्ये बदल घडविण्याची ताकद आणि क्षमता असते. नव्या आशाआकांक्षांना त्यांच्या उमेदीतूनच धुमारे फुटत असतात. त्यांना दिशा देण्याची, प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नावीन्याचा ध्यास घेऊन, मळलेली वाट सोडून वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळावी. सामाजिक पातळीवरील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याबरोबरच नवे घडविण्याची आणि समाजाला मांगल्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी महिलांना बळ मिळावे, यासाठी ‘लोकमत’ सातत्याने प्रयत्न करीत आहे. आजच्या ‘लोकमत वुमेन समीट’मधून या विचाराला दिशा मिळावी, कृतिशील पाऊल पुढे पडावे, हा आमचा हेतू आहे.
>महिलांच्या प्रश्नांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होण्यासाठी लोकमत वुमेन समीटची मोठी भूमिका राहिली आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर येथे चर्चा होते. सध्या देशात ‘मी टू’ चळवळीचे वादळ घोंगावत आहे. या चळवळीमुळे स्त्रीशक्तीचा आवाज बुलंद होत आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या, गतिमानतेच्या युगात समाजाचा अर्धा हिस्सा असणाºया स्त्रीशक्तीचा आवाज बुलंद होत आहे. मात्र, महिला शक्ती ही विध्वंसक नाही तर विधायक आहे. आजची ‘मी टू’ चळवळच पुढे जाऊन ‘मी टुगेदर’ बनावी. महिलांना सामाजिक प्रतिष्ठा देण्यासाठी समाजाची मनोभूमिका तयार व्हावी, हाच या वुमेन समीटचा उद्देश आहे.
( लेखक 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आहेत.)