विमानतळापर्यंत मेट्रो
By admin | Published: October 24, 2015 04:43 AM2015-10-24T04:43:20+5:302015-10-24T04:43:20+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याच्या वाहतूक समस्या सोडवणुकीसाठी सुरू केलेल्या मोहिमेत आता वनाज ते रामवाडी मेट्रोला विमानतळापर्यंत नेण्यासाठी
पुणे : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याच्या वाहतूक समस्या सोडवणुकीसाठी सुरू केलेल्या मोहिमेत आता वनाज ते रामवाडी मेट्रोला विमानतळापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी तसेच लोहगाव विमानतळ प्राधिकरणाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी रविवारी (दि. २५) गडकरी पुण्यात बैठक घेणार आहेत. विमानतळाची धावपट्टी वाढविण्याबरोबरच आवश्यक असलेल्या इतर भूसंपादनाबाबतही या वेळी चर्चा होणार आहे.
गेल्या महिन्यात ‘लोकमत’च्या आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनाप्रसंगी लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी
गडकरी यांच्यासमोर पुण्याच्या वाहतुकीसंदर्भातील विविध प्रश्न मांडले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी यांनी पुण्याच्या वाहतूक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिल्ली आणि पुण्यामध्ये बैठका घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिल्लीतील बैठकीत पुण्यातील अनेक वाहतूक प्रश्न मार्गी लागले व आता पुण्यात विमानतळाच्या प्रश्नांबाबत ही बैठक होत आहे.
वनाज ते रामवाडी या मार्गात अंशत: बदल सुचविण्यात आले
असून, हा मार्ग मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, हा मार्ग
पुढे विमानतळापर्यंत वाढविल्यास त्याची उपयुक्तता वाढणार
आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडूनही माहिती सादर करण्यात येणार आहे. या बैठकीस महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह विभागीय आयुक्त
एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
नवीन विमानतळाच्या जागाही ठरणार
या बैठकीत नवीन विमानतळाची जागाही निश्चित होण्याची शक्यता आहे. चाकण येथे विमानतळासाठी जागा देण्यास विरोध झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून ते इतरत्र हालविण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.
पुणे विमानतळ ते ५०९ पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणे, विमानतळाच्या परिसरात सीआयएसफच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी १० एकर जागा देणे, विमानतळ ते नगर रस्त्यापर्यंत सिग्नल यंत्रणा तसेच पार्किंगचे नियोजन करणे, एटीएफवर २५ टक्क्यांऐवजी ४ टक्के व्हॅट लावणे, विमानतळासाठी आवश्यक पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, महावितरणचे खांब हालविणे, मोठ्या विमानांसाठी धावपट्टीचा विस्तार करणे, वायुसेना व विमान प्राधिकरणामधील विविध करार करणे, या शिवाय भारतीय वायुसेनेसाठी इंदिरानगर परिसरात ५ एकर जागा देणे, विमानतळाच्या १० एकर परिसरात कचरा व्यवस्थापन यंत्रणा, स्वतंत्र विद्युतव्यवस्था उभारणे, या विषयांवर चर्चा होणार आहे.
पुण्यातील सर्वाधिक रहदारीच्या असलेल्या पुणे-नगर रस्त्यावरून मेट्रो विमानतळाला जोडण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. राज्यशासनाने स्वारगेट ते
पिंपरी या मेट्रो मार्गास
मान्यता दिलेली आहे.