पुण्याच्या विद्वतेमुळेच मेट्रोला विलंब : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 09:04 PM2018-11-16T21:04:54+5:302018-11-16T21:08:15+5:30
मेट्रो वरून की खालून यावर पुण्यात फार विचार झाला. विद्वतेतील पुण्याची मक्तेदारी मान्यच आहे पण त्यामुळेच मेट्रोला विलंब झाल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पुणे : मेट्रो वरून की खालून यावर पुण्यात फार विचार झाला. विद्वतेतील पुण्याची मक्तेदारी मान्यच आहे पण त्यामुळेच मेट्रोला विलंब झाल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मेट्रो व महापालिका संयुक्तपणे करणार असलेल्या नळस्टॉप चौकातील डबलडेक उड्डाणपुलाचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे माजी सभापती मुरलीधर मोहोळ, पुण्यातील सर्व आमदार, महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रोसाठी झालेला विलंब भरून काढू. जगात कुठेही झाले नाही एवढे वेगात पुण्यामध्ये मेट्रोचे काम होत आहे असा दावाही त्यांनी केला. जगात कुठेही मेट्रोचे काम पहिल्या वर्षात फक्त १५ टक्के होते. पुण्यात ते २५ टक्के झाले आहे. याच वेगाने कामाचा बॅकलॉग भरून काढण्यात येईल.इ-बस ही पुण्यात लवकरच वापरात येतील. सोलर एनर्जी वापरून बस धावतील. शिवाजीनगर ते हिंजवडी असा मार्गही लवकरच तयार होईल. पीपीपी तत्वावर तो करत आहोत. स्वारगेटजवळ मोठा ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यात येत आहे. त्यात मेट्रोसह एस.टी. पीएमपीएल अशा तिन्हींचा समावेश असेल.
पालकमंत्री बापट म्हणाले, पंधरा वर्ष त्यांची सत्ता होती, हे करू, ते करू असे फक्त म्हणत होते, कधी करू ते मात्र सांगतच नव्हते. आम्ही एका वर्षात करून दाखवत आहोत. मेट्रो च्या कामाला गती देण्यात येणार आहे. पुणेकरांनीभाजपाला भरभरून दिले आहे. आता आम्हीही कामात कमी पडणार नाही.मोहोळ म्हणाले, स्थायी समितीचे अध्यक्षपद पहिल्याच वेळेला पक्षामुळे मिळाले. त्यावेळी निवडणूक जाहीरनाम्यात असलेले प्रत्येक आश्वासन प्रत्यक्षात आणायचे या भावनेने काम केले. या पुलासाठी विशेष तरतुद केली. तासाभरात ३२ हजार वाहनांची येजा होत असलेला कर्वेरस्ता हा सर्वाधिक वाहतूकीचा रस्ता आहे. त्यामुळे या पुलाची गरज होती. मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष असल्यामुळे त्यांनी लगेचच या कामासाठी वेळ दिली.उपमहापौर डॉ. धेंडे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुदळ मारून मंत्रघोषात भूमीपूजन करण्यात आले. नगरसेवक माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजूश्री खेडेकर यांच्या हस्ते खासदार, सर्व आमदार यांचा सत्कार करण्यात आला.
बापटांची हुकलेली संधी काकडेंनी साधली
पुण्याच्या प्रदुषणात वाढ झाली आहे. वीसपंचवीस वर्षांपर्वी या काळात पुण्यात छान थंडी असायची. मेट्रोमुळे प्रदुषण कमी होते. ती वेगवान असते. वेळ वाचतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो चांगला पर्याय आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.भूमीपूजन करताना पालकमंत्री बापट यांच्या हातून वाढवण्यासाठी घेतलेले श्रीफळ सुटले व ते दूर गेले. खासदार संजय काकडे यांनी ते हातात घेतले व वाढवले. बापट यांच्या हातून सुटलेले श्रीफळ काकडे यांनी वाढवले अशी मल्लीनाथी लगेचच यावर काहींनी केली.