प्रारूप आराखड्यातून मेट्रो गायब?
By admin | Published: July 21, 2015 03:25 AM2015-07-21T03:25:49+5:302015-07-21T03:25:49+5:30
महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यात मेट्रोचा समावेश करून विकास नियंत्रण नियमावलीत त्याविषयी बदल करण्याची मुदत संपली आहे
पुणे : महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यात मेट्रोचा समावेश करून विकास नियंत्रण नियमावलीत त्याविषयी बदल करण्याची मुदत संपली आहे. तरीही महापालिकेने राज्य शासनाकडे आवश्यक बदलाचा आराखडा पाठविलेला नाही. त्यामुळे शासनाची अधिसूचना रद्द होणार असून, प्रारूप आराखड्यात मेट्रोचा समावेश करता येणार नाही, असा दावा पुणे बचाव समितीचे उज्ज्वल केसकर यांनी सोमवारी केला. मात्र, महापालिका प्रशासनाने हा दावा फेटाळला आहे.
महापालिकेने जुन्या विकास आराखड्यामध्ये मेट्रोमार्ग दाखवून विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची अधिसूचना राज्य शासनाने १९ जुलै २०१४ रोजी दिली होती. राज्य शासनाच्या एमआरटीपी अॅक्टनुसार प्रक्रिया एक वर्षात करणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेला प्रारूप आराखडा मंजुरीसाठी विलंब व अपयश आले. त्यामुळे प्रारूप आराखड्यात मेट्रो मार्गाचा समावेश होणार नाही, अशी माहिती केसकर, प्रशांत बधे व सुहास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.