‘आयटीयन्स’साठी मेट्रो गैरसोयीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:17 PM2018-03-13T13:17:52+5:302018-03-13T13:21:40+5:30
‘आयटीयन्स’ची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान ‘मेट्रो’ मार्ग प्रस्तावित करण्यात आला. मात्र तरीही ‘आयटीयन्स’ना मेट्रो लाभकारी ठरणार नसल्याचे चित्र समोर आले आहे.
वाकड : माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्क हिंजवडीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान, सक्षम व सुरक्षित करण्यासाठी सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र अद्यापही येथील वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही. ‘आयटीयन्स’ची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान ‘मेट्रो’ मार्ग प्रस्तावित करण्यात आला. मात्र तरीही ‘आयटीयन्स’ना मेट्रो लाभकारी ठरणार नसल्याचे चित्र समोर आले आहे. तब्बल १८ वर्षे वाहतूक कोंडीचा सामना करून मेटाकुटीला आलेल्या आयटीयन्सना मेट्रोच्या रूपाने आशेचा किरण दिसत होता. असे असताना ‘आयटी’ पार्क फेज तीनपर्यंत (माण) जाणारी मेट्रो वाकड पुलापासून बाणेरमार्गे पुण्यात जाणार असल्याने आयटी अभियंत्यांना दुरूनच डोंगर साजरे करावे लागणार आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३३ किमी अंतराच्या मेट्रो मार्गात कृषी महाविद्यालय, आरबीआय, पुणे विद्यापीठ, सकाळनगर, कृषी अनुसंधान, बाणेर, बाणेरगाव, बालेवाडी फाटा, लक्ष्मीनगर, रामनगर, निकमर, बालेवाडी शिवछत्रपती स्टेडियम, वाकड चौक, हिंजवडी, शिवाजी चौक, पर्ल इंडिया चौक, फेज २, विप्रो टेक्नॉलॉजी चौक, इन्फोसिस फेज २, डॉलर चौक, द क्वॉड्रन आणि सर्वांत शेवटी मेगा पोलीस सर्कल असे एकूण २३ स्टेशन असणार आहेत. या मार्गे मेट्रो धावणार असल्याने आयटीचे प्रमुख वास्तव्य असलेल्या इतर परिसरातील आयटीयन्सना व इतर नागरिकांना मेट्रोचा फारसा फायदा होणार नाही. मार्च २०२१ पर्यंत मेट्रोचे काम पूर्ण होणे अपेक्षित असून २३.३३ किमी अंतराच्या मार्गासाठी व २३ स्टेशनसाठी एकूण ७९६४ कोटी खर्च होणार आहे. आयटी पार्क, हिंजवडीशेजारील उत्तम डीपी प्लॅन असलेली वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, सांगवी, औंध, औंध रस्ता, पिंपळे गुरव, जगताप डेअरी आदी भाग आयटीयन्सच्या वास्तव्यास सर्वाधिक पसंतीचा असल्याने या परिसरातील पट्ट्यात सर्वाधिक आयटीयन्स नोकरदारांचे मोठे जाळे आहे. मेट्रो या मार्गातून घेण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली होती असे असतानाही २३.३३ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गामध्ये हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतून व मेगा पोलीस सर्कल हे शेवटचे स्टेशन करत पुन्हा वाकड चौकातील पुलापासून मुंबई-बेंगळूर महामार्गाने म्हाळुंगे-बालेवाडी श्री छत्रपती क्रीडा संकुलासमोरून बाणेरमार्गे सकाळनगर, पुणे विद्यापीठ, कृषी विद्यापीठमार्गे शिवाजीनगरला जाणार आहे.
४हिंजवडीत नोकरी करणारे सर्वाधिक अभियंते वास्तव्य करत असलेल्या मार्गाने मेट्रो मार्ग गेला असता, तर या परिसरातील आयटी अभियंत्यासंह कामगार, व्यावसायिक व विद्यार्थ्यांना मेट्रोचा अधिकाधिक वापर करता आला असता. शिवाजीनगर ते हिंजवडी-माण् पर्यंत २३ स्टेशनद्वारे जाताना अनेक महत्त्वाच्या कंपन्यांच्या चौकात स्टेशन आहेत.
पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सुरू असलेल्या कामात आयटी अभियंत्यांना विचारात घेतले नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. वाहतूककोंडीतुन सुटका करणे हा उद्देश जर मेट्रोचा असेल तर सध्याच्या आराखड्यानुसार सुरू असलेली मेट्रोची वाटचाल आयटीयन्ससाठी लाभदायक ठरणार नाही, मात्र दिल्ली मेट्रो रेल कापोर्रेशनने (डीएमआरसी) सद्य:स्थिती व भविष्यातील बाबींचा आढावा घेत विचार करून केलेल्या सर्वेक्षणानुसार याच मार्गाच्या आराखड्याला अंतिमत: मंजुरी मिळाल्याने हिंजवडीत काम करणारे आणि हिंजवडीलगतच्या गावात राहणाऱ्या आयटीयन्सच्या आशा जवळपास धूसर झाल्या आहेत. महामेट्रो रेल कापोर्रेशन लिमिटेडच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकत्रितपणे पुणे मेट्रो प्रकल्प राबविला जातोय; मात्र या प्रकल्पात पिंपरी-चिंचवड शहराचा नामोल्लेख नाही. मेट्रोचे काम शहरासह पुण्यात ठिकठिकाणी सुरू आहे. पिंपरी ते स्वारगेट या १६ आणि वनाज ते रामवाडी या १४ किलोमीटर अंतरापैकी केवळ सव्वा सात किलोमीटरपर्यंतच मेट्रो शहरातून धावणार आहे.
४मेट्रो केवळ शहरातील एका चौकाला वळसा घालून जाणार आहे. या प्रकल्पाच्या एकूण ३१ किलोमीटर अंतरापैकी पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रो केवळ ७.२५ किलोमीटर अंतर धावेल. शिवाजी नगर हिंजवडी या २३.३० किमी मार्गात केवळ वाकड पुलाच्या पुढील चौकात ३०० मीटरच्या महापालिका हद्दीतील मार्गात मेट्रो जाणार आहे. स्वारगेट ते निगडी मेट्रो पहिल्या टप्प्यातच करण्याची मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
४हिंजवडीत जगप्रसिद्ध आयटी पार्क असतानाही केवळ वाहतूक कोंडीच्या कारणावरून अनेकजण ताशेरे ओढतात. गेली अनेक वर्षे कोंडी सहन करणाºया आयटी अभियंत्याची सुटका यातून करण्यासाठी तसेच त्यांचा प्रवास सुरळीत आणि जलद व्हावा हे कारण पुढे करून शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो आरखडा मंजूर करण्यात आला. मात्र या मार्गात आयटीयन्सचे वास्तव्य असलेल्या परिसराचा विचार झालेला नाही.