महायुती विकासाची मेट्रो तर महाविकास आघाडी बंद पडलेलं इंजिन; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:57 AM2024-05-04T11:57:04+5:302024-05-04T11:57:48+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ वारजे माळवाडीतील अतुलनगर येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते...
पुणे : महायुती विकासाची मेट्रो आहे, तर महाविकास आघाडीकडे फक्त एकच इंजिन आहे आणि तेही बंद पडलेलं आहे, त्याला डबेही नाहीत आणि त्या इंजिनामध्येही केवळ एकालाच बसायला जागा आहे, अशी खाेचक टीका भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ वारजे माळवाडीतील अतुलनगर येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी उमेदवार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, माजी आमदार माणिक कोकाटे, विजय शिवतारे, रूपाली चाकणकर, प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, दिलीप बराटे, हर्षदा वांजळे, सायली वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, सबका साथ सबका विकास म्हणत महायुतीची मेट्रो सर्व डब्यांना सोबत घेत विकासाच्या दिशेने निघाली आहे, तर दुसरीकडे आघाडीकडे एकच इंजिन आहे आणि त्यात केवळ एकाच ड्रायव्हरला बसायला जागा आहे. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया आणि प्रियांका, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया तर उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य यांनाच जागा आहे. देशातील इंडिया आघाडीच्या इंजिनाचे चार दिशेला चार तोंड झाले आहे. त्यामुळे ते जागेवरून हलत, डुलत आणि चालतही नाही, ते बंद पडलेलं इंजिन झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रचारादरम्यान मतदारांच्या डोळ्यातील आस मला आत्मविश्वास देत होती. लोकांनी सेवेची संधी दिली तर ती सार्थ करून दाखवीन.
... तर पुण्याला मिळेल आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा
पुण्यातील मेट्रो भारतात सर्वात वेगाने तयार झाली. मुळा-मुठा स्वच्छता कोटींचा एसटीपी प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक सुधारणासाठी निधी दिला. सध्या रिंग रोड साकारतोय त्यामुळे पुण्याला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त होईल. पुण्यात पूर्वी बॉम्बस्फोट झाले मात्र, २०१९ नंतर एकही आतंकवादी देशात बॉम्बस्फोट करू शकला नाही, असेही फडणवीस म्हणाले.