वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे-शिरूर महामार्गावर मेट्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:57+5:302020-12-23T04:07:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक ...

Metro on Pune-Shirur highway to ease traffic congestion | वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे-शिरूर महामार्गावर मेट्रो

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे-शिरूर महामार्गावर मेट्रो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : पुणे-शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग एकत्र येऊन रस्त्याचा विकास करणार आहे. यासाठी वाघोली ते शिक्रापूर आणि रामवाडी ते रांजणगाव एलिव्हेटेड मेट्रो, सहा पदरी रस्ता, दोन पदरी सर्व्हीस रोड आणि पाच उड्डाणपूल असा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

राज्यातील सर्वाधिक जुन्या महामार्गांपैकी एक म्हणून पुणे-नगर महामार्गाची ओळख आहे. परंतु वाढते शहरीकरण आणि रांजणगाव एमआयडीसीतली औद्योगिक वाहतूक, रस्त्यांच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण, वाघोली ते शिक्रापूर दरम्यानचा अरुंद रस्ता, ओढ्या-नाल्यावरील अतिक्रमणे या सर्वामुळे पुणे ते शिरूर या रस्त्यावर दररोजच प्रचंड वाहतूक कोंडी होते. याचा मोठा फटका नियमित प्रवास करणारे, शेतकरी आणि एमआयडीसीतील वाहतुकीला देखील बसतो. या वाहतूक कोंडीवर वेळीच उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतील. यासाठी पुणे-शिरुर महामार्गवरील अडथळे विरहित वाहतूकीसाठी विविध उपाय योजना करण्याचे नियोजन सुरू आहे.

चौकट

साडे पाच हजार कोटींचा खर्च

पुणे - शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो आणि संबंधित विकास कामांसाठी ५ हजार ४२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा निधी उभारण्यासाठी रस्त्यावर पथकर लागू करणे, महामार्गालगतच्या ५१ हजार ३२९ चौरस मीटर शासकीय जागा विकसित कणरे, सीएसआर निधी आणि पीएमआरडीएकडून मेट्रोसाठीचा निधी उभारणे हे पर्याय सुचविले आहेत.

चौकट

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तीन यंत्रणा एकत्र

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र बसून समन्वयातुन काम मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएच्या कार्यालयात राष्ट्रीय महामार्गाचे सचिव विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.”

- अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, पुणे

Web Title: Metro on Pune-Shirur highway to ease traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.