रामवाडी ते वाघोली, विमाननगरपर्यंत मेट्रो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:35 AM2018-07-18T01:35:54+5:302018-07-18T01:36:01+5:30
मेट्रो प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली
पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे-नगर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले नागरीकरण व वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रामवाडी ते वाघोली आणि रामवाडी ते विमाननगर या दोन्ही मार्गांवर मेट्रो प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या रामवाडी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मेट्रो मार्गामुळे रामवाडीपर्यंतच्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. रामवाडीपासून पुढे खराडी, वाघोलीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे या भागात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.
पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाहतूकदेखील याच परिसरातून होत असल्याने सध्या येथे नियमित प्रचंड वाहतुकीची कोंडी होते.
या भागात आयटी क्षेत्रातील कंपन्यांची संख्या खूप मोठी आहे. या कंपन्यांमधून काम करणाऱ्या कर्मचाºयांना आवश्यक असणारी सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरेशी नाही; तसेच लोहगाव विमानतळावर हवाई वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने प्रवाशांची मोठ्या संख्येने वर्दळ वाढली आहे. हा परिसर विकसित झाल्याने नागरीकरण वाढले आहे. भविष्य काळातील विकासाच्या दृष्टीने रामवाडी ते वाघोली व रामवाडी ते विमानतळ या दोन्ही मार्गांवर मेट्रो प्रकल्प सुरू करण्यासाठी त्याचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) लवकरात लवकर करण्यात
यावा, यासाठी स्थायी समितीने
मान्यता दिल्याची माहिती मुळीक यांनी दिली.