संभाजी उद्यानात मेट्रोची प्रतिकृती , स्वातंत्र्यदिनी उद््घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:09 AM2018-08-14T02:09:35+5:302018-08-14T02:09:47+5:30
मेट्रोच्या माहिती केंद्राचे उद््घाटन १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिनी सकाळी ध्वजवंदनाच्या वेळेस होणार आहे. हे केंद्र म्हणजे मेट्रोच्या डब्याची हुबेहूब प्रतिकृतीच आहे.
पुणे - मेट्रोच्या माहिती केंद्राचे उद््घाटन १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिनी सकाळी ध्वजवंदनाच्या वेळेस होणार आहे. हे केंद्र म्हणजे मेट्रोच्या डब्याची हुबेहूब प्रतिकृतीच आहे. ही प्रतिकृती बसवण्याचे काम सोमवारपासून छत्रपती संभाजी उद्यानात सुरू झाले. स्वातंत्र्य दिनापासून हे केंद्र नागरिकांसाठी खुले होईल.
मेट्रोचे काम सुरू झाले तेव्हापासून महामेट्रो कंपनी नागरिकांच्या माहितीसाठी म्हणून असे एखादे केंद्र सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील होती. नागपूर येथे त्यांनी मेट्रो कोचच्या प्रतिकृतीमध्ये असे माहिती केंद्र सुरू केले व ते सार्वजनिक ठिकाणी बसवले. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ते पुण्यातही यासाठी जागेच्या शोधात होते. छत्रपती संभाजी उद्यानातील काही जागा त्यांनी त्यासाठी मागितली होती.
मात्र, उद्यानात कार्यालय बांधून राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचा रोष महापालिका प्रशासनाने ओढवून घेतला होता. उद्यानात कोणत्याही स्वरूपाचे पक्के बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे महापालिकेला त्यांनी केलेले बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला होता. त्यातूनच मेट्रोच्या
माहिती केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेने तत्काळ नकार दिला. महामेट्रोला सार्वजनिक ठिकाणाच्या जागेचीच गरज होती. नागरिकांचा जास्त संपर्क येईल अशा जागेतच त्यांना केंद्र सुरू करायचे होते.
अखेरीस उद्यानात नाही व उद्यानापासून लांबही नाही, अशी जागा आता यासाठी शोधण्यात आली आहे.
महापालिकेचीच जागा असल्यामुळे त्यांनी ती महामेट्रोला दिली आहे. माहिती केंद्रासाठी आलेली मेट्रोच्या डब्याची प्रतिकृती त्या जागेत बसवण्याचे काम सोमवारी सकाळी सुरू करण्यात आले. मेट्रोच्या डब्यासारखीच या केंद्राची रचना असेल. आतील आसनव्यवस्था तशीच असेल. दोन्ही बाजूंना टच स्क्रिन असतील. त्यावरून नागरिकांना मेट्रोसंबंधीची सर्व माहिती दिली जाईल.
माहिती केंद्रात होणार सर्व शंकांचे निराकरण
मेट्रो मार्ग, काम कधी होणार, भुयारी मार्ग कसा असेल अशा अनेक शंका पुणेकर नागरिकांमध्ये आहेत. त्या सर्व शंकांचे निराकरण या माहिती केंद्रातून होईल, असा विश्वास वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल गाडगीळ यांनी व्यक्त केला. या बोगीमध्ये सर्व संगणकीय यंत्रणा बसविण्यात येत असून, स्वातंत्र्य दिनापर्यंत हे केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होईल, असे ते म्हणाले.