व्यावसायिक इमारतींमधून मेट्रोला उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:38 AM2019-01-15T00:38:02+5:302019-01-15T00:38:16+5:30
ब्रिजेश दीक्षित : वनाज डेपोचे काम पंधरा दिवसांत सुरू
पुणे : महामेट्रोचा भांडवली खर्च बराच मोठा आहे. त्यामुळेच उत्पन्नाची बाजू सावरण्यासाठी वनाज व रेंजहिल येथील डेपो, स्वारगेट, शिवाजीनगर येथील मल्टी ट्रान्सपोर्ट हब या ठिकाणी व्यावसायिक इमारती बांधून त्यातील गाळे भाडेतत्त्वावर देऊन महामेट्रो त्यातून उत्पन्न मिळवणार आहे. वनाज डेपोतच सुमारे ७ लाख चौरस फूट व्यावसायिक क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचे काम येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार आहे.
महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. भुयारी मार्गाच्या कामाची पूर्वतयारी म्हणून कृषी महाविद्यालय व स्वारगेट या दोन्ही ठिकाणी शाफ्टचे काम सुरू करण्यात आले आहे. ठेकेदार कंपनीची यंत्रसामग्री येण्यापूर्वीच हे काम तयार असेल. त्यामुळे या कामाला गती मिळेल. सन २०२१ मध्ये भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईल, असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यापूर्वीच जमिनीवरून जाणाऱ्या (इलेव्हेटेड) मेट्रोचे काम पूर्ण होईल व भुयारी मार्ग पूर्ण झालेला नसला तरीही ती वनाज ते गरवारे महाविद्यालय किंवा नदीपात्रातून त्यापुढे अशी सुरूही करता येईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.
दीक्षित म्हणाले, व्यावसायिक इमारतींमधून उत्पन्न मिळवणार याचा अर्थ महामेट्रो बिल्डर होणार नाही. कंपनीची भूमिका विकसकाची असेल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वाने या इमारती बांधल्या जातील. बांधकाम परवानग्यांसाठी महामेट्रोची वेगळी व्यवस्था असेल, त्यामुळे पालिकेची परवानगी लागणार नाही. मेट्रो मार्गापासून ५०० मीटर अंतरामध्ये जादा एफएसआय मिळणार आहे. त्याचा फायदा तसेच बांधकाम विकसन शुल्कामध्ये कंपनीची टक्केवारी याचे उत्पन्न मेट्रोला मिळेल. डेपो किंवा इमारती बांधतानाच त्या व्यावसायिक विचार करून बांधल्या जाणार आहेत. वनाज डेपोच्या सर्व बाजूंनी अशा इमारती असतील व आतमध्ये मेट्रोचा डेपो आहे हे कळणारसुद्धा नाही. याचपद्धतीने स्वारगेटच्या मल्टिट्रान्सपोर्ट हबचे काम करण्यात येईल.
स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचा तो बीआरटीमधून करायचा की मार्केट यार्डमार्गे याचा अभ्यास सुरू आहे. ज्या मार्गावर जास्त प्रवासी मिळणार असतील तोच मार्ग केला जाईल. याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही व पालिकेचीही काही घाई नाही, अशी माहिती देऊन दीक्षित म्हणाले, ‘कोथरूडपासून पुढे नियोजित शिवसृष्टीपर्यंत १ किलोमीटरचा मार्ग करू; पण तसा कोणताही प्रस्ताव अद्याप पालिकेने दिलेला नाही.
निगडीपर्यंत, चाकणपर्यंत असे विस्तारीत मार्गाचे प्रस्ताव आले व त्याचा डीपीआरही तयार झाला. तशी मागणी आली की त्यानंतरच काम सुरू केले जाते.’ पुण्यातील वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गाचे काम गतीने सुरू आहे. नागपूरपाठोपाठच पुणे मेट्रोचीही चाचणी होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.
साडेसहाशे कोटींचा खर्च
मेट्रोचा प्रकल्प एकूण ११ हजार ४०० कोटी रुपयांचा आहे. आतापर्यंत ६४७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तो अंदाजपत्रकीय तरतुदींमधूनच करण्यात आलेला आहे. कर्ज अद्याप काढण्यात आलेले नाही, कारण त्याचे व्याज लगेचच सुरू होते. मात्र कर्जाची सर्व प्रक्रिया परदेशी कंपन्यांबरोबर पूर्ण झाली आहे. मागणी झाले की ते
त्वरित उपलब्ध होईल.
तबला आणि वीणा
स्थानकांपासून दूरवरचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी महामेट्रो फर्ग्युसन रस्ता ते डेक्कन तसेच डेक्कन स्थानकापासून नदीपात्रातून छत्रपती संभाजी महाराज उद्यानापर्यंत केबल ब्रीज (पायी चालण्यासाठी स्कायवॉक) तयार करणार आहे. परिसरातील बालगंधर्व रंगमंदिराचा विचार करून या ब्रीजना अनुक्रमे तबला व वीणा यांचा आकार देणार आहे.
स्वारगेट-कात्रज अजून निर्णय नाही.
स्वारगेट ते कात्रज या मार्गासाठी वेगवेगळे प्रस्ताव येत आहेत. खर्च जास्त उत्पन्न कमी असा मार्ग करण्यात येणार नाही. उत्पन्न देणाºया मार्गाचाच विचार करण्यात येईल. त्याशिवाय जागा संपादन करता येईल का, त्यात काही अडचणी येतील का अशा बºयाच गोष्टींचा विचार करून नंतरच निर्णय घेण्यात येतो. अजून तसा कोणताच निर्णय झालेला नाही.
पीएमपी, एसटी यांचेही सहकार्य
स्वारगेट तसेच डेक्कन येथील पीएमपीची जागाही विकसित करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच एसटी महामंडळाबरोबर शिवाजीनगरच्या त्यांच्या स्थानकाबाबत चर्चा सुरू आहे. त्यांना बरोबर घेऊन या सर्व जागांचा व्यावसायिक पद्धतीने मेट्रोच्या साह्याने विकास करण्यात येणार आहे.
आगाखान पॅलेस हेच कारण
नगर रस्त्यावरील मार्ग बदलण्याचे कारण आगाखान पॅलेस हेच आहे. बांधकाम व्यावसायिकांचा फायदा व्हावा म्हणून मार्ग बदलला, या टीकेत काहीही तथ्य नाही. न्यायालयाचे निर्देश आहेत. त्या मार्गालाही विरोध होत आहे. विरोध होत असतो, त्याचा विचार करून काम पुढे नेणे गरजेचे असते. दुसरा कोणता मार्ग सुचवावा, त्याचा विचार केला जाईल.
सोशल मीडियाचा वापर
महामेट्रो आता इन्स्टाग्राम, ब्लॉग पोस्ट यावरही असणार आहे. फेसबुकवरील मेट्रो पेजला १ लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावर केलेल्या सर्व सूचनांचा विचार केला जात असतो. २३ जानेवारीला पुणे मेट्रोचा वर्धापनदिन असून, त्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.