मेट्रो, रिंग रोड, नदी सुधारणेला प्राधान्य
By admin | Published: March 28, 2017 02:45 AM2017-03-28T02:45:47+5:302017-03-28T02:45:47+5:30
रिंगरोड, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, विशेष डाटाबेस डिजीटल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी
पुणे : रिंगरोड, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, विशेष डाटाबेस डिजीटल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी भरिव तरतूद असलेला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा ७९९ कोटी ६५ लाख रुपयांचा अर्थसंकल्पास मुख्यमंत्री व प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी व मंजूरी देण्यासाठी सोमवारी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार माधुरी मिसाळ, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त दिनेश वाघमारे उपस्थित होते.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम-२०१६ नुसार स्थानिक प्राधिकरण आणि नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रात अग्निशमन केंद्र स्थापन करून कार्यान्वित करण्यासाठी अग्निशमन शुल्काद्वारे ३५ कोटी रक्कम जमा अपेक्षित आहे. तसेच यासाठी १५ कोटी रुपये भांडवली खर्चाची तरतूद केली आहे. प्राधिकरणाच्या अत्याधुनिक कार्यालयासाठी ५ कोटींची तरतूद आहे. याशिवाय पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यासाठी २० कोटी, येरवडा येथे नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोसाठी ४५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रिंगरोडसाठी १४६ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधाच्या विकास बरोबरच इंद्रायणी व अन्य नद्यांचा सुधारणेसाठी १० कोटी रुपये, पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंड उपनगरीय रेल्वेसाठी ९ कोटी ३ लाख रुपयांची तरतूद आहे.
तुकाराम मुंढे पीएमपीएमएलसाठीच
अनधिकृत बांधकाम व इतर अनेक धडक कारवाईमुळे वादग्रस्त ठरलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुण्याच्या पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. परंतु अद्याप त्यांनी पदभार स्विकारला नसल्याने त्यांची दुसरीकडे पोस्टींग होण्याची चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता पीएमपीएमएलसाठी पूर्णवेळ अधिकारी म्हणूनच मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.