मेट्रो धावली रात्रीत, वनाज ते आयडियल कॉलनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:50+5:302021-07-10T04:08:50+5:30
पुणे : वनाज ते आयडियल कॉलनी या ८०० मीटरच्या मार्गावर गुरुवारी (दि. ८) रात्री अकरा वाजता मेट्रोची तांत्रिक चाचणी ...
पुणे : वनाज ते आयडियल कॉलनी या ८०० मीटरच्या मार्गावर गुरुवारी (दि. ८) रात्री अकरा वाजता मेट्रोची तांत्रिक चाचणी घेण्यात आली.
ही प्रकल्पांतर्गत चाचणी अभियंत्यांनी घेतल्याने मेट्रोच्या वरिष्ठांना त्यासाठी बोलावण्यात आले नसल्याचे मेट्रोचे जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, या परिसरातील नागरिकांनी मात्र रात्री अचानक मेट्रो मार्गावर मेट्रो अवतरल्याचा आनंद घेतला. काहींनी लगेच त्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियात व्हायरल केले.
अतिशय कमी वेगात चालणारी ही मेट्रो रस्त्यावर थांबून अनेकांनी पाहिली. पाऊस नव्हता आणि काही कामे व्यवस्थित झाली आहेत किंवा नाही, हे पाहण्यासाठी ही चाचणी घेतल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले. ३ कोच लावून ही चाचणी झाली. मेट्रोचे दिवे लावण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील खांबांवरून चालणारी मेट्रो मनोहारी दिसत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
चौकट
वनाज ते गरवारे महाविद्यालय हा साधारण ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून महामेट्रोने जाहीर केला आहे. त्यावरील आयडियल कॉलनी व गरवारे महाविद्यालय या स्थानकांचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. एसएनडीटी महाविद्यालय व अन्य दोन स्थानकांचे कामही गतीने सुरू आहे. मेट्रो मार्ग पूर्ण झाला आहे. पिंपरी-चिंचवड ते दापोडी या दुसऱ्या प्राधान्य मार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. १६ ऑगस्ट २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. त्याचवेळी या वनाज ते गरवारे मार्गाचेही लोकार्पण व्हावे, यासाठी महामेट्रोची धडपड सुरू आहे.