Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी
By श्रीकिशन काळे | Updated: July 1, 2024 20:04 IST2024-07-01T20:04:46+5:302024-07-01T20:04:58+5:30
वारकऱ्यांनी मेट्रो मध्ये भजन, कीर्तन, विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला

Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी
पुणेः विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर... कपाळी गंध- टिळा, हाती भगवा पताका घेवून वारकऱ्यांनी सिव्हिल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिविल कोर्ट असा मेट्रो प्रवास केला. सरकत्या जिन्यावरून वर जात, तिकीट घेतल्यानंतर आपोआप उघडणारा दरवाजा पाहून अप्रूप वाटणाऱ्या वारकऱ्यांनी मेट्रो मध्ये भजन, कीर्तन, विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला.
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुणे तर्फे वारकऱ्यांसाठी सिविल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिविल कोर्ट अशी मेट्रोची सफर आयोजित केली. यावेळी नाथ संस्थानाचे पिठाधीश ह.भ.प गुरूबाबा महाराज औसेकर, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित, दत्ताभाऊ कावरे, डॉ. शैलेश गुजर, प्रदीप इंगळे, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.
पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम आहे. पुणेकरांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असा संदेश वारकऱ्यांनी यावेळी दिला. यावेळी वारकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे किट, गुडदाणीची पॅकेट, बिस्किटाचे पुडे दिले.
गुरुबाबा औसेकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून देहू आळंदी मध्ये वारकरी येतात. त्यांची येण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून एसटीची वारंवारता वाढवावी. नितीन पंडित म्हणाले, विकसित मेट्रो सेवेचा अनुभव ग्रामीण भागातील आपल्या वैष्णव बांधवांना व्हावा याच भावनेतून वारकरी बांधवांसाठी मेट्रो सफरचे आयोजन केले.