मेट्रो : शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर होणार, डिसेंबरअखेर कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:24 AM2018-09-26T03:24:56+5:302018-09-26T03:26:08+5:30
शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या ५ किलोमीटरच्या भुयारी मार्गाच्या कामात बाधित होणाऱ्या सर्वांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
पुणे - शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या ५ किलोमीटरच्या भुयारी मार्गाच्या कामात बाधित होणाऱ्या सर्वांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रो कंपनी संबंधितांशी चर्चा करत आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे पहिले भुयारी स्थानक होणार असल्याने एसटी स्थानक तिथून संगमवाडी किंवा नजीकच्या अन्य ठिकाणी हलवण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने त्याला मान्यता दिली असून, महामेट्रो त्यांना पुन्हा त्याच्या जागेवर स्थानकाची उभारणी करून देणार आहे.
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे मुख्य प्रकल्प अभियंता प्रमोद आहुजा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, भुयारी मार्गाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. येत्या महिनाभरात त्याला अंतिम स्वरूप मिळेल. कंपनी निश्चित झाली की यंत्रसामग्री वगैरेची तयारी करण्यासाठी त्यांना साधारण २ महिने लागतील. त्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत भुयारी मार्गाचे काम सुरू होईल. ते स्वारगेटपर्यंत पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल. रोज साधारण ४ ते ५ मीटर काम होणे अपेक्षित आहे. एकूण ४ यंत्रे काम करतील. दोन शिवाजीनगरपासून व दोन स्वारगेटपासून. हे मुख्य काम सुरू करण्याआधी करावे लागणारे शाफ्टचे (यंत्र आत उतरवण्यासाठी लागणारा स्लोब) काम सुरू झाले आहे. तेही लवकरच पूर्ण होईल.
भुयारी मार्गात शिवाजीनगर, सिव्हिल कोट, फडके हौद, मंडई व स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके असल्याची माहिती देऊन आहुजा म्हणाले, ‘‘प्रवाशांना जमिनीवर येण्यासाठी व आत जाण्यासाठी असे दोन मार्ग जमिनीवर असतील. या जागा निश्चित झालेल्या आहेत. त्यात साधारण २२५ जण बाधित होत आहेत. काही दुकानेही आहेत. त्या सर्वांचे रोखीने किंवा पर्यायी जागा देऊन पुनर्वसन होत आहे. प्रत्येक बाधिताबरोबर स्वतंत्रपणे बोलणी करण्यात येत आहे. भुयारी मार्गातून वर येण्यासाठी असलेल्या जागेवर वाहनतळाची व्यवस्था असेल. काही ठिकाणी ते शक्य नाही, तिथे प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग असेल.’’
जमिनीच्या आत जास्तीत जास्त २८ मीटर व सरासरीने १८ मीटर खोलीवर भुयारी मार्ग असेल. तो तयार करताना निघणाºया सर्व राडारोड्याचा वापर स्थानकांच्या फरशा तयार करण्यासाठी, कटरमधून निघणारी पावडर रस्त्यांचे पृष्ठभाग तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ज्याचा उपयोग होणार नाही असा राडारोडा फेकून देण्यासाठी काही साईट्स शोधल्याचे आहुजा म्हणाले.
रेल्वे मंडळाचीही जागा मेट्रोला मिळणार
संरक्षण मंत्रालयाच्या पाठोपाठ आता रेल्वे मंत्रालयानेही पुणे मेट्रोसाठी लागणारी त्यांची जागा देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या खात्यांच्या मालकीच्या जागेचे संपादन करण्याची महामेट्रो कंपनीची अडचण आता दूर झाली आहे. खडकी परिसरातील रेल्वे बोर्डाची जागा महामेट्रोला हवी होती. ती देण्यास मंजुरी मिळाली आहे, असे दीक्षित म्हणाले.
महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ‘‘संरक्षण मंत्रालय व रेल्वे बोर्ड यांची खडकी परिसरातील काही जागा महामेट्रोला हवी होती. ती मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे खडकी परिसरातील महामेट्रोचे काम रखडले होते. तिथे महामेट्रोला संरक्षण मंत्रालयाची १० एकर जागा हवी होती. रेल्वेच्या रुळांवरूनही मेट्रो जात आहे. त्यामुळे त्यासाठीही रेल्वे बोर्डाची परवानगी मिळणे महामेट्रोला गरजेचे होते. त्यांची काही जागाही हवी होती. संरक्षण मंत्रालयाबरोबर बोलणी सुरू होती. जागा देण्यास त्यांची हरकत नव्हती, मात्र त्यांना त्या बदल्यात पर्यायी जागा हवी होती. ती राज्य सरकारच्या मालकीची होती. तशी जागा देण्यास राज्य सरकार तयार झाले. त्यामुळे संरक्षण मंत्रालयानेही त्यांची जागा मेट्रोला देण्यास मंजुरी दिली.’’