Pune Metro: १२ हजार कोटी खर्चून मेट्रो सुरु; स्थानकांपर्यंत प्रवासी कसे येणार? मनसेचे लक्ष्य आता मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 10:52 IST2024-12-27T10:51:22+5:302024-12-27T10:52:07+5:30
महामेट्रोने तत्काळ पुरेशी फिडर सेवा प्रवाशांना उपलब्ध करून द्यावी, याची दखल घेतली नाही तर आंदोलन करणार, मनसेचा इशारा

Pune Metro: १२ हजार कोटी खर्चून मेट्रो सुरु; स्थानकांपर्यंत प्रवासी कसे येणार? मनसेचे लक्ष्य आता मेट्रो
पुणे : तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा मेट्रो प्रकल्प शहरात उभा राहिला, मात्र, त्यांच्या स्थानकांपर्यंत येण्यासाठी प्रवाशांना कसलीही सुविधा नाही. विशेषत: कोथरूड परिसरातील प्रवाशांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे, त्यामुळे महामेट्रो कंपनीने तत्काळ ही सेवा कोथरूडमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून मेट्रो स्थानकांपर्यंत सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामेट्रो कंपनीला देण्यात आले.
मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस तसेच केदार क़ोडोलीकर, संजय दिवेकर, प्रियंका पिसे, रोहित गुजर, महेश शिर्के, अशोक गवारे, संगीता कुंभार व अन्य पदाधिकाऱ्यांनी महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ तसेच जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांची गुरूवारी सकाळी भेट घेतली. त्यांना या मागणीचे निवेदन दिले. कोथरूड परिसरातून मेट्रोचा नियमित वापर करणारे नागरिकही त्यांच्यासमवेत होते.
संभूस यांनी सांगितले की मेट्रोची नियमित प्रवासी संख्या वाढणे गरजेचे आहे. ती का वाढत नाही याचे प्रमुख कारण मेट्रोच्या स्थानकापर्यंत यायचे कसे? हा प्रश्न आहे. महामेट्रो कंपनीने आधीच स्थानकांजवळ वाहनतळ देण्याची जबाबदारी आमची नाही, असे सांगितले आहे तसे असेल तर दुचाकी, चारचाकी वाहने लावायची कुठे ही अडचण आहे. प्रवाशांना त्यांच्या घराजवळून स्थानकापर्यंत येण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, महामेट्रो कंपनी याचा विचार करायला तयार नाही.
गाडगीळ व सोनवणे यांनी महामेट्रो व पुणे प्रादेशिक परिवहन लिमिटेड (पीएमपीएल) यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा दाखला दिला. मात्र, त्यांच्याकडून फारच थोड्या मार्गांवर ही सेवा देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र वारजेपासून वनाजपर्यंत,पौड फाटा, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण व अन्य काही परिसरातून सकाळी, दुपारी व संध्याकाळी, रात्रीही काही गाड्या सोडणे आवश्यक आहे. त्या नसल्यामुळे प्रवाशांना रिक्षाला दामदुप्पट पैसे देऊन स्थानकापर्यंत यावे लागते. त्याऐवजी स्वत:ची गाडी घेऊन जाणे प्रवासी पसंत करतात. फक्त कोथरूडच नाही तर मेट्रोच्या दोन्ही मार्गांवरील प्रत्येक स्थानकाजवळ हीच स्थिती आहे. त्यामुळे महामेट्रोने तत्काळ पुरेशी फिडर सेवा प्रवाशांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेतली नाही तर मनसेला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.