मेट्रो स्थानकांचे कामही लवकरच सुरू
By admin | Published: May 11, 2017 04:54 AM2017-05-11T04:54:28+5:302017-05-11T04:54:28+5:30
बहुचर्चित पुणे मेट्रोच्या ‘पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स कॉर्नर’ या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गाच्या कामाच्या निविदेनंतर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बहुचर्चित पुणे मेट्रोच्या ‘पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स कॉर्नर’ या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गाच्या कामाच्या निविदेनंतर आता लगेचच याच मार्गावरील ९ स्टेशनच्या कामाची निविदाही येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध होत आहे. मेट्रोच्या उन्नत (इलेव्हिटेड-रस्त्याच्या वरून जाणाऱ्या) मार्गावरील ही सर्व स्टेशनही मार्गाला जोडूनच म्हणजे उन्नतच असतील.
या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गावर एकूण ९ स्टेशन असणार आहेत. प्रत्येक स्टेशनचा विस्तार १४० मीटर गुणिले ४० मीटर इतका असेल. हे स्टेशन मेट्रो मार्गाला जोडूनच असेल. सुरुवात जिथून होणार आहे ते पीसीएमसी स्टेशन व त्यानंतर तुकाराम नगर, भोसरी (नाशिक फाटा) कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी व रेंजहिल अशी ९ स्टेशन असणार आहेत. या १० स्टेशनच्या कामाची एकच निविदा असेल, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी दिली. येत्या दोनच दिवसांत निविदा प्रसिद्ध होईल. त्यानंतर मुदतीत आलेल्या कंपनीच्या निविदांपैकी पात्र निविदा मंजूर करून लवकरच याही कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
सर्व स्टेशन उन्नत असणार असून, जमिनीपासून ते साधारण २० ते २२ मीटर उंचीवर असतील. ती तीन स्तरांत विभागलेले असेल. पहिल्या स्तरावर मेट्रोमधून उतरता येईल. त्यानंतर लगेच त्याच्या खालील मजल्यावर प्रवेश होईल. तिथे कॅफेटेरिया असेल. या जागेतून थेट खाली म्हणजे रस्त्यावर येता येईल. ही सर्व स्टेशन अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येणार आहेत. एका स्टेशनचा बांधकामाचा खर्च साधारण ४० ते ४५ कोटी रुपयांपर्यंत असेल. त्यासाठीच्या जागापैकी बहुतेक जागा सरकारी मालकीच्या आहेत. त्या मिळण्यात काहीच अडचण नाही. जिथे अडचण आहे त्याठिकाणी संबधितांशी चर्चा करण्यासाठी महामेट्रोने एक समिती स्थापन केली असून, ही समिती त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढेल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.
दीक्षित यांनी सांगितले की, स्टेशनवर चढण्या-उतरण्यासाठी सरकते जिने असतील. त्यामुळे कोणालाही उंचीचा त्रास होणार नाही. स्टेशनवरून उतरलेल्या प्रवाशांना लगेचच रिक्षा, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या बस यांची कनेक्टीव्हिटी मिळेल. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय स्टेशनच्या जवळ वाहनतळ असेल. महापालिकेबरोबर बोलून त्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रोजवळ येताना किंवा मेट्रोपासून लांब जाताना प्रवाशांना काहीही त्रास होणार नाही. याशिवाय मेट्रो, बस यासाठी एकच कॉमन कार्ड चालेल. प्रवाशांना प्रत्येक वेळी तिकीट काढण्यासाठी वेळ घालवावा लागणार नाही.
स्टेशनच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कंपनीला काम देईपर्यंत थोडा वेळ लागले. त्यानंतर मात्र तेही काम संबंधित ठेकेदार कंपनीला त्वरित सुरू करण्यास सांगण्यात येणार आहे. या कामाचा नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे; मात्र तो कमीतकमी होईल याची काळजी मेट्रो कंपनी घेणार आहे, असे दीक्षित यांनी सांगितले. नागरिकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.