मेट्रोच्या बोगद्याने केली हो मुठा नदी पार; जमिनीच्या खाली साकारतेय पुण्याची 'नवी' ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 09:36 PM2021-05-12T21:36:26+5:302021-05-12T21:49:13+5:30
पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचा मुठा नदीखालच्या भागाचे काम पूर्ण झाले आहे.
पुणे: मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचा मुठा नदीखालच्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. खोदकाम करणारे टीबीएम आता नदीपार करून पूढे पोहचले आहे. नदीच्या तळाखालून १३ मीटर खोलीवर हा बोगदा आहे. नदीपुढे आता कसबा पेठेतील महापालिकेच्या दादोजी कोडदेव शाळेकडे खोदकाम सुरू होईल.
कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटर अंतरात, जमिनीच्या खाली ३० मीटरवर शहराची नवी ओळख आकार घेत आहे. सिव्हिल कोर्टपासून पुढे सुरू झालेले मेट्रोच्या भुयाराचे कामाने आता मुठा नदी पार केली आहे. दहा ते बारा दिवसांपासून भुयाराचे काम सुरु होते. पुढे कसबा पेठेत जाण्याचे काम सुरू होईल. सिव्हिल कोर्ट जवळ मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. त्याचे काम सुरू आहे.
कृषी महाविद्यालय ते सिव्हिल कोर्ट काम पुर्ण झाले आहे. आता पुढचे काम सुरू आहे. जमिनीखाली ३० मीटर खोलीवर दोन टनेल बोअरिंग मशिनने हे काम सुरू आहे. मुठा नदीच्या तळाखाली १३ ते १४ मीटर अंतरानंतर ही दोन्ही भुयारे आहे. वर नदीचे पाणी आणि खालून मेट्रो धावते आहे अशी स्थिती असेल.
पुढे कसबा पेठेत दादोजी कोंडदेव महापालिका शाळेच्या जून्या जागेत भुयारी स्थानक आहे. तिथपर्यंत हा बोगदा जाणार आहे. तिथून पुढे मंडईत झुणका भाकर केंद्रापर्यंत खोदकाम होणार आहे. स्वारगेटपासून सुरू झालेले दोन्ही बोगद्यांचे कामही मंडईपर्यंत होणार आहे. तिथून सर्व यंत्र जमिनीवर घेतली जाणार आहे.
या ५ किलोमीटरच्या अंतरात ५ भुयारी स्थानके आहेत. प्रत्येक स्थानकात दोन्ही भुयारे एकत्र होतील. मध्ये फलाट व दोन्ही बाजूला जाणारी व येणारी अशा दोन मेट्रो असतील. स्थानक गेले.की पुन्हा दोन्ही भुयारी वेगळी होतील.