पुण्याची मेट्रो रखडणार
By admin | Published: December 2, 2014 11:51 PM2014-12-02T23:51:56+5:302014-12-02T23:51:56+5:30
मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या पुणे मेट्रोला पुन्हा रेड सिग्नल मिळण्याची शक्यता निर्माण झाली
पुणे : मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या पुणे मेट्रोला पुन्हा रेड सिग्नल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील मेट्रो भूमिगत असावी की जमिनीवरून यावरून दोन प्रवाह निर्माण झाल्याने या दोन्ही बाजू दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) ने ऐकून घ्याव्यात आणि त्यांच्यापुढेही मेट्रोचे सादरीकरण करावे, असा निर्णय दिल्ली येथे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोसाठीच्या सर्व बाबींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पीआयबी) आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता या शेवटच्या दोन टप्प्यावर आलेली मेट्रोची मान्यता आणखी लांबणार आहे.
दोन वर्षांपासून मंजुरीसाठी रखडलेल्या मेट्रो प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीतील संसद भवनात बैठक बोलाविली होती. खासदार अनिल शिरोळे, अॅड. वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, रजनी पाटील, श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह, केंद्रीय नगरविकास विभागाचे व डीएमआरसीचे अधिकारी उपस्थित
बैठकीत प्रकल्पाबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. पुण्यातील मेट्रो प्रकल्प हा काही भागात भुयारी तर काही भागात जमिनीवरील असा असणार आहे. मात्र भुयारी मेट्रो राबविण्याची मागणी काही स्वयंसेवी संस्थांनी लावून धरल्यामुळे मेट्रो प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण या स्वयंसेवी संस्थांपुढे करावे, त्यांची बाजू जाणून घ्या, अशा सूचना जावडेकर यांनी डीएमआरसीला केल्या.
तसेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात बैठक घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे ही पुण्यातील बैठक झाल्याशिवाय मेट्रोचे पीआयबी समोरील सादरीकरण होण्याची सूतरामही शक्यता नसल्याने मेट्रोची मान्यताही लांबणीवर
पडणार असल्याचे स्पष्ट झाले
आहे. (प्रतिनिधी)