संभाजी पुलावरील मेट्रोचे काम अजूनही रखडले; कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:57 PM2021-12-03T13:57:01+5:302021-12-03T13:57:58+5:30
नवी रचनेसाठी सुमारे ७० कोटी रुपये अतिरिक्त खर्च येईल. शिवाय मेट्रोचे काम आणखी २ वर्षे लांबेल, असा अहवाल महामेट्रोने दिला
पुणे : “संभाजी पुलावरील मेट्रोचा पूल आता बदलणे शक्य नसून, तसे करायचे तर मेट्रो पुलाचे तब्बल ३९ खांब पाडून नवीन रचना करावी लागेल. यासाठी सुमारे ७० कोटी रुपये अतिरिक्त खर्च येईल. शिवाय मेट्रोचे काम आणखी २ वर्षे लांबेल, असा अहवाल महामेट्रोने दिला आहे. यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते व मेट्रो अधिकाऱ्यांच्यात पुन्हा बैठक घेऊन समन्वयातून मार्ग काढला जाईल,” असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
संभाजी पुलावरून मेट्रो मार्ग जात असल्याने या पुलावरून २२ फूट उंचीवर मेट्रोकरिता पूल उभारण्यात येत आहे. मात्र, या पुलामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा होईल, असा आक्षेप घेत काँग्रेसचे गटनेते आबा बागुल व काही गणेशोत्सव मंडळांनी त्यास विरोध केला. त्यामुळे गेले तीन महिने हे काम बंद आहे. या कालावधीत महापौरांनी गणेश मंडळ कार्यकर्ते, मेट्रो पदाधिकारी आणि वाहतूक पोलिसांची बैठक बोलावली. या बैठकीत मोहोळ यांनी संभाजी पुलावरील मेट्रोच्या कामाचा अहवाल देण्याची सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना केली होती.
त्यानुसार महामेट्रोने आपला अहवाल महापौरांकडे दिला. यात मेट्रो पुलाची उंची ४० फुटांपर्यंत वाढविल्यास सुमारे ९७८ मीटरची मार्गिका बदलावी लागणार असून, यासाठी ३९ खांब काढून नव्याने बांधावे लागणार आहेत. यासाठी दोन वर्षे खर्ची पडणार असून, सुमारे ६९ कोटी ७० लाख रुपये खर्च येईल. पुलाची उंची ३० फुटांपर्यंत वाढविल्यास ४७८ मीटरची मार्गिका बदलावी लागणार असून, यासाठी दीड वर्षे कालावधी व २३ कोटी रुपये खर्च येणार आहे. याचबरोबर नव्याने परवानग्या मिळवणे व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार असल्याचे महामेट्रोने अहवालात नमूद केले आहे.