Pune Metro: मेट्रोकार्ड एक, पण प्रवाशांचे फायदे दोन; १३ हजार पुणेकरांची स्मार्ट तिकिट खरेदी
By राजू इनामदार | Published: September 4, 2023 08:24 PM2023-09-04T20:24:42+5:302023-09-04T20:25:17+5:30
एक विशेष म्हणजे मेट्रोशिवाय अन्य खरेदी किंवा हॉटेलिंगसाठीही हे कार्ड वापरता येणार
पुणे: मेट्रोच्यातिकिट खरेदीत १३ हजार पुणेकरांनी स्मार्टपणा दाखवला आहे. मेट्रो कार्ड ऑन लाईन खरेदी करून त्यांनी तिकिटाच्या दरात १० टक्के सवलतही मिळवली. ऑन लाईन तिकिटाची खरेदी १५ हजार होईपर्यंत कार्ड विनामुल्य मिळणार आहे.
असे काढायचे कार्ड
सध्या सुरू असलेल्या मार्गावरील मेट्रोच्या प्रत्येक स्थानकात हे मेट्रो कार्ड उपलब्ध आहे. त्याची खरेदी ऑन लाईनच करायची आहे. मेट्रोच्या पोर्टलवर गेले की मेट्रो कार्ड असा पर्याय येतो. त्यावर क्लिक केले की पुढे माहिती येते. यात केवायसी ( ओळख, बँक, खाते क्रमांक वगैरे माहिती) आहे. ते पूर्ण झाले की हव्या त्या रकमेचे मेट्रो कार्ड खरेदी करायचे. १०० रूपयांपासून ते पुढे कितीही रकमेचे कार्ड मिळते.
असा होतो वापर
ते नजिकच्या स्थानकावरून ताब्यात घ्यायचे. बाकी सर्व गोष्टी ऑन लाईन असल्या तरी कार्ड घेण्यासाठी स्थानकावर जावेच लागेल. हे कार्ड स्थानकात असलेल्या स्वाईप मशिनमध्ये ( कार्ड फिरवण्याचे यंत्र) फिरवले की त्यातून पैसे आपोआप कपात होतील. मेट्रोच्या कोणत्याही मार्गासाठी कोणत्याही स्थानकावर हे कार्ड वापरता येणार आहे. त्याचा आणखी एक विशेष म्हणजे मेट्रोशिवाय अन्य खरेदी किंवा हॉटेलिंगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.
जोरदार प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्टला मेट्रोच्या विस्तारीत मार्गांचे विस्तारीकरण झाले. तेव्हापासून आतापर्यंत १३ हजार पुणेकरांनी या मेट्रो कार्डची ऑन लाईन खरेदी केली. मेट्रो कार्ड खरेदी करणाऱ्यांना तिकिट दरात १० टक्के सवलत मिळते. त्याशिवाय कार्डची किंमत द्यावी लागत नाही. ते विनामुल्य मिळते. १५ हजार कार्डची विक्री होईपर्यंत ही सवलत राहणार आहे. त्यानंतर मात्र कार्डसाठी १५० व जीएसटी असे एकूण १५७ रूपये द्यावे लागतील.
सवलतीमुळे नियमीत प्रवासी खुश
मेट्रोने नियमीत प्रवास करणाऱ्यांनी असे कार्ड काढण्याला पसंती दिली आहे. कोणत्याही करात सवलत घेण्यात पुणेकर आघाडीवर आहेत. त्यामुळेच आर्थिक वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यात मिळकत करात देण्यात येणारी सवलत मिळवण्यासाठी अनेक पुणेकर मिळकत कर ऑन लाईन जमा करून टाकतात. तोच प्रकार मेट्रोतही झाला आहे. सवलत जाहीर करताच कार्ड खरेदी वाढली आहे.
उर्वरित मार्ग सुरू करावेत
विस्तारीत मार्ग सुरू होताच मेट्रोला असणारा प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. दररोज तब्बल ६० हजार प्रवासी दोन्ही मेट्रो मार्गावर मिळून प्रवास करतात. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या महिनाभरात मेट्रोला दोन्ही मार्गांवर मिळून ३ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळेच आता स्वारगेट ते कसबा पेठ ( व्हाया मंडई) हा भूयारी व रुबी हॉल ते रामवाडी या उन्नत हे शिल्लक राहिलेले दोन विस्तारीत मार्ग त्वरीत सुरू करावेत अशी मागणी मेट्रो प्रवाशांकडून होत आहे.