मेट्रोसाठी महानगर एकात्मिक प्राधिकरण, मार्गांचा होणार विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:20 AM2017-11-10T02:20:54+5:302017-11-10T02:20:57+5:30

शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा व मेट्रो रेल परस्परांना पूरक व्हावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने महानगर एकात्मिक वाहतूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे.

Metropolitan Integrated Authority for the Metro, will be the extension of routes | मेट्रोसाठी महानगर एकात्मिक प्राधिकरण, मार्गांचा होणार विस्तार

मेट्रोसाठी महानगर एकात्मिक प्राधिकरण, मार्गांचा होणार विस्तार

googlenewsNext

पुणे : शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा व मेट्रो रेल परस्परांना पूरक व्हावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने महानगर एकात्मिक वाहतूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. ही स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडून मेट्रोच्या विस्तारीकरणाचे आराखडे मंजूर करून घ्यावे लागतील. दरम्यान, येत्या महिनाभरात मेट्रोसाठीच्या स््नथानकांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की शहरात सध्या पीएमपीएल, रिक्षा, खासगी कारसेवा अशी वेगवेगळ्या प्रकारची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा आहे. मेट्रो व या सेवा परस्परांना पूरक असल्या पाहिजेत, तरच त्याचा उपयोग होईल. त्यासाठीच महानगर एकात्मिक वाहतूक प्राधिकरणाची स्थापन करण्यात येणार आहे. मेट्रो कायद्यातच तशी तरतूद करण्यात आली आहे, असे दीक्षित म्हणाले.
शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांची गैरसोय तसेच कोणाच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये अशा पद्धतीनेच आराखडा तयार करण्यात येत आहे. काही गोष्टी होतील; मात्र त्याची पूर्वकल्पना संबंधितांना दिली जाईल. या भूमिगत मार्गासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे साह्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील दहा स्थानकांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वनाज-रामवाडी मार्गावरील स्थानकांचा आराखडा सध्या तयार करण्यात येत आहे. मुठा नदीलगत असलेले शहरातील वेगवेगळे पूल मेट्रोसाठी उपयुक्त ठरावेत, असा विचार केला जात आहे.
सर्व स्थानकांचे आराखडे एक महिन्यात तयार होतील व त्यानंतर निविदा प्रसिद्ध केल्या जातील. हेही काम प्रवासी केंद्रबिंदू धरूनच केले जात आहे, असे दीक्षित यांनी सांगितले.
मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. ती गरजही आहे; मात्र त्यासाठी आराखडे तयार करावे लागतात, त्याला राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. या कामाला बराच वेळ लागतो. त्यामुळेच महानगर एकात्मिक वाहतूक प्राधिकरणाची स्थापना केली जात आहे. त्यांच्या माध्यमातून हे आराखडे अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येतील, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.

बीआरटी मार्ग
ठेवायचा की काढायचा?
पुणे : मेट्रो रेल रस्त्यापासून २० ते २२ मीटर उंचीवरून जाणार असली तरी ती ज्या खांबांवरून जाणार आहे, ते खांब रस्त्याच्या बरोबर मध्यभागी असणार आहेत. या रस्त्यावरून जाणाºया बीआरटी मार्गाला त्यांचा अडथळा होणार असल्याने बीआरटीचे करायचे काय, असा प्रश्न महामेट्रोला पडला आहे. यातून समन्वय व सामंजस्याने मार्ग काढला जाईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
पिंपरी ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी अशा दोन्ही मेट्रो मार्गाचे काम आता संथ गतीने का होईना सुरू झाले आहे. वाहतुकीला पर्यायी व्यवस्था तयार करणे, वाहनतळाची सोय करणे, अशा अनेक अडचणींचा सामना करीत मार्गांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याबाबत दीक्षित यांनी माहिती दिली. नागरिकांना कमीतकमी त्रास व्हावा, वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मेट्रोमार्गापासून पीएमपीएल या सार्वजनिक प्रवासी बससेवेची आवश्यकता आहेच; मात्र बस कमी अंतरावरचे प्रवासी घेऊ शकते, तसेच उतरवू शकते, मेट्रोला ते शक्य नाही. त्यामुळे ती सेवाही सुरूच राहायला हवी, पण बीआरटीचे काय करायचे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. संबंधित संस्थांच्या प्रमुखांशी संपर्क साधून समन्वयातून मार्ग काढण्यात येईल. सध्या महामेट्रोकडून याचे सर्वेक्षण सुरू आहे. ते पूर्ण झाले की काय करता येईल याचा निर्णय घेता येईल. तत्पूर्वी संबंधित संस्थांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या काम सुरू असलेले मेट्रोचे दोन्ही मार्ग शहराचा बराच मोठा भाग व्यापतात; मात्र भविष्यात हेच दोन मार्ग राहतील असे नाही. त्यांचा पुढे विस्तार होईल व अन्य काही मार्गही अस्तित्वात आणले जातील. शहरात मेट्रो रेलचे जाळे निर्माण होईल तसतशी रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल. त्यामुळेच ही सेवा जास्तीतजास्त लोकाभिमुख करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे, असे दीक्षित म्हणाले.

Web Title: Metropolitan Integrated Authority for the Metro, will be the extension of routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.